पंढरपूर : गेली तीन वर्षे दुष्काळ असल्याने शेतकर्यांचे खूप नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यंदाच्या वर्षी पावसाविषयी माझी बर्याच तज्ज्ञांशी चर्चा झाली असून, त्यांनी मला पाऊस पडण्याचे खूप कमी संकेत असल्याची माहिती सांगितली आहे. यामुळे मी विठ्ठलाकडे राज्यात भरपूर पाऊस पडू दे! शेतकरी आणि जनता आनंदी राहू दे! मागितल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर देव दर्शनासाठी निघालेले मुंडे हे सोमवारी विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते दत्तासिंह रजपूत, काशिनाथ थिटे, राजेंद्र गायकवाड, रमेश वाघोलीकर, सुरेशराव मोरे, श्रीराम तांदळे, गिरीश आराध्ये, डॉ. धायतडक उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, ज्या मैदानावर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सभा घेण्याची परवानगी मागितली होती, ती निवडणूक आयोगाने नाकारली. तर त्याच मैदानावर कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा झाली. यामुळे निवडणूक आयोग हे निपक्ष कर्तव्य बजावत नसल्याचे दिसून येत आहे. भाजपाला सर्वत्र बहुमत मिळणार आहे. यामुळे एकहाती सरकार स्थापन होणार असल्यामुळे कुठल्याही पक्षाची मदत घेण्याची गरज पडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सहाजणांची महायुती आहे. अजून सातव्या पक्षाला बरोबर घेण्याचा विचार केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------------
पवारांनी मानली हार...
२००९ च्या लोकसभेला माढा मतदारसंघातून सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले राष्टÑवादीचे सर्वेसर्वा कृषीमंत्री शरद पवार हे देशात सर्वत्र नरेंद्र मोदी यांचे वारे असल्याने निवडणूक लढण्यापूर्वीच हार मानून राज्यसभेवर गेल्याचे मुंडे म्हणाले.
---------------------
मराठा आरक्षण देणार
भाजपाचे सरकार आल्यानंतर अनेक दिवस चर्चेत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा मिटवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.