गुरुवारी अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस ठाण्याच्या वार्षिक दप्तर तपासणीसाठी आल्यानंतर पोलीस अधीक्षक सातपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक रणजित माने, उपनिरीक्षक छबू बेडर, उपनिरीक्षक बाडीवले, आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात दप्तर तपासणीनंतर कर्मचाऱ्याचा दरबार घेतला. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेत सोडविण्याचे आश्वासन दिले. रोडरोमिओ, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी सातपुते म्हणाल्या, अवैध धंदे करणारे व त्यांना साथ देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यातील ११८ सराईत गुन्हेगारांवर तडीपार, मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील ५० सराईत गुन्हेगारांवर कारवाई झाली आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी विशेष पथक कार्यरत राहणार आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. शहरातील सीसीटीव्ही लावण्यासाठी नगरपालिकेकडून निधी उपलब्ध झाल्यास गुन्हेगारीला आळा घालणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
......
म्हणून गवळी, पवार यांची बदली
दक्षिण व उत्तर पोलीस ठाण्याचे दोन्ही पोलीस निरीक्षक यांच्या अल्प कालावधीत झालेल्या बदलीबाबत त्या म्हणाल्या, राजेश गवळी हे चांगले व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. काही वेळेस चुकीचे, पुढील अनर्थ टाळण्यासाठी बदल्या कराव्या लागतात. त्यानुसार निर्णय घेतला. उत्तरचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी ज्या प्रकारे काळजी घ्यायला हवी होती, तशी घेतली नाही. पोलीस खात्यात काम करीत असताना बारकावे लक्षात घ्यावे लागतात. ते त्यांनी घेतले नाही. यामुळे बदली करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
...............
दक्षिण पोलीस ठाण्याचे जानेवारीत उद्घाटन
दक्षिण पोलीस ठाण्याचे बंद ठेवलेले बांधकाम सुरू करण्यात येणार असून, जानेवारी महिन्यात उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. दक्षिण पोलीस ठाण्याची पेंडन्सी कमी झाली आहे. आता २५ टक्के पेंडन्सी असल्याचेही त्यांनी सांगितले.
.........