रवींद्र देशमुख
सोलापूर : सन २००९ साली शरद पवारांमुळे चर्चेत आलेल्या माढा मतदारसंघाने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. आगामी निवडणूक माढ्यातूनच लढावी, असा नेत्यांचा आग्रह असल्याचे पवारांनी स्वत:हून शुक्रवारी सांगितल्याने माढ्याच्या माळरानाला पुन्हा बारामतीच्या कॅलिफोर्नियाचे अन् विकासाच्या झगमगाटाचे स्वप्न दाखविले जाणार का?.. असा प्रश्न विरोधकांमधून उपस्थित केला जात असला तरी यदाकदाचित पवार उभे राहिल्यास पुन्हा एकदा २००९ चा इतिहास घडवू, असा निश्चय राष्टÑवादीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील बारामती हॉस्टेलवर झालेल्या राष्टÑवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीस माढ्याचे विद्यमान खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते - पाटीलही उपस्थित होते. विशेष म्हणजे पवारांना माढ्यात लढण्याचा आग्रह धरणाºयांमध्ये तेही होते. माढा मतदारसंघ नव्याने निर्माण झाल्यानंतर पवार हे त्या मतदारसंघाचे पहिले खासदार झाले. माढ्याचा गड जिंकणे पवारांसाठी त्यावेळी सहज सोपे होते. राष्टÑवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसबरोबर सत्तेत होता. पक्षातील नेत्यांचे स्वत:चे किल्ले मजबूत होते. याही स्थितीत पवारांना माढेकरांवर आश्वासनांची उधळण करावी लागली. पवारांनी जितकी आश्वासनं दिली, त्याहीपेक्षा त्यांच्या शिलेदारांनी माढावासीयांना अधिक स्वप्नं दाखविली.
बारामतीला जोडणाºया आणि अंतर्गत रस्त्यांवर पावलोपावली विकासाची समृध्दी दिसत आहे. हा असा विकास माढ्याचाही होईल...माढ्याचं ‘बारामती’ होईल, असे मतदारांना सांगण्यात आले. माढेकरांनाही ते पटले; पण इतकी वर्षे लोटल्यानंतरही माढ्याचं बारामती काही झालं का? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. अशा परिस्थितीत यदाकदाचित पवार उभे राहिल्यास निवडणूक रंगतदार होऊ शकते.
पुन्हा एकदा माढ्याचीच भाषा का?माढ्यामध्ये २००९ ची स्थिती २०१९ मध्ये नाही, हे पवारही पुरतं ओळखून आहेत. या स्थितीत पवारांनी माढ्याची भाषा पुन्हा का करावी? याबाबतही नेते होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. माढ्यातील राष्टÑवादीचे किल्लेदार गत पाच वर्षांत सत्ता नसतानाही राजकीयदृष्ट्या मजबूत झालेले आहेत. या शक्तीचा उपयोग ते विरोधकांविरोधात न वापरता स्वपक्षीयांचा प्रभाव कमी करण्यातच खर्ची घालत आहेत. काही शिलेदारांनी पक्षांतर करून सत्ताधाºयांच्या गटात सामील होणे पसंत केले आहे. शिवाय पवार लढणार नसतील; तर त्यांच्या ‘मनातील’ उमेदवारांना साथ मिळेल, अशी स्थिती मतदारसंघात नाही. त्यामुळे माढा हातचा जाऊ नये अन् मतदारसंघातील पक्ष संघटनेची नव्याने मजबूत बांधणी व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माढ्यात येऊ शकतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
शरद पवार या मतदारसंघात उभे राहिले तर आम्हाला आनंदच होईल. भावी पंतप्रधान माढ्यातून मिळण्याची शक्यता नाकारायचे काही कारण नाही. महाराष्टÑाला पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर माढ्याचे भाग्य उजळेल.- आ. बबनराव शिंदे
२००९ साली मी राष्टÑवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो. आम्ही पवार यांचा प्रचार करण्यासाठी समांतर प्रचार यंत्रणा उभारुन काम केले. त्यावेळी असे वाटत होते की आम्ही पंतप्रधानांना मत टाकतोय. माढा मतदारसंघाचा विकास बारामतीसारखा होईल, परंतु राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे सरकार असताना सुध्दा माढ्यात काहीच कामे झाली नसल्याने आता माढ्याची जनता सहजासहजी पवार यांना मत देईल असे वाटत नाही.- संजय कोकाटेभाजप तालुका अध्यक्ष
दहा वर्षांपूर्वी मी शरद पवारांच्या विरोधात लढलो, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. तेव्हा ते केंद्रीय मंत्री होते. माढा मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांची बांधणी सुरू होती. आज कमालीचं वातावरण बदललंय. त्यावेळी त्यांनी माढ्याला बारामती बनविण्याची जी-जी भली मोठी आश्वासनं दिली होती, त्याचं पुढं काय झालं, हे जनतेला पूर्ण ठाऊक आहे. अनेक वर्षे सातत्याने तुम्ही लोकांना वेड्यात काढू शकत नाही. राहता राहिला विषय शरद पवारांच्या विरोधात पुन्हा उभं ठाकण्याचा. मी सातत्याने सांगत आलोय, माझ्या पक्षाने कोठेही उभारण्याचे आदेश दिले तर मी एका पायावर तयार असतो. माढ्यात पवारांना पराभूत करण्याची संधी मिळत असेल तर कुणाला नकोय? - सुभाष देशमुख, सहकार मंत्री
पवारांना माढ्यात उभारण्याबाबत विजयदादांनी विनंती केल्याने कानावर आले, त्यावेळी मी टेंभुर्णीत कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होतो. पवार जर उभारणार असतील तर मला नक्कीच आनंद होईल. त्यांचा मनापासून प्रचार करण्यास मी कदापिही मागेपुढे पाहणार नाही. - प्रभाकर देशमुख
देशाचा ज्येष्ठ नेता माढ्यासारख्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असेल त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करू. शरद पवारांना या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी मी आणि माझी टीम सर्वस्वी मदत करण्यासाठी तयार आहे.- गणपतराव देशमुखआमदार, सांगोला
माढा लोकसभेच्या चित्राबद्दल आजच्या क्षणी काही सांगणे सध्या तरी अवघड आहे. समोरचा उमेदवार कोण असेल हे अजून निश्चित नाही. मात्र उमेदवार हा जिल्ह्यातील असावा.- शहाजीबापू पाटील, माजी आमदार