‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे. मात्र मदत करताना आर्थिक हितसंबंध येता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. परवा एका लग्नाला मी गेलो होतो. साधारणत: पन्नाशीतील एक काकू मंडपात असलेल्या प्रचंड गर्दीतून माझ्याजवळ आल्या.
मला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू व चेहºयावरील स्मितहास्याने त्यांचा हात माझ्या गालावरून फिरवत कडाकडा बोटे मोडली आणि म्हणाल्या,‘राजा, तुझ्यामुळे माझा नवरा वाचला. तुझे उपकार मी विसरू शकत नाही रे...’ त्यांच्या बोलण्यातून त्यांची माझ्याबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त होत होती. लग्नमंडपात उपस्थित सारे जण अचंबित होऊन संवाद ऐकत होते. आज तब्बल दहा-बारा वर्षांनंतर पुन्हा आम्ही एका लग्नातच भेटत होतो हे विशेष. काकूंकडे पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत घडलेली घटना मला आठवली.
ती घटना अशी साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वीची. संबंधित काकू कलबुर्गीहून त्यांचे पती अंबण्णा यांच्यासोबत एका लग्नासाठी सोलापूरला आल्या होत्या. मीदेखील त्या लग्नात होतो. लग्नकार्य उरकल्यानंतर जेवण करून आम्ही तेथून निघण्याच्या तयारीत होतो. इतक्यात त्या काकूंचे पती अंबण्णा मंडपातच चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यांचे शरीर थरथर कापत होते. मी लांबूनच ते दृश्य पाहून त्यांच्याजवळ गेलो. त्यांचे शरीर तापाने फणफणलेलं होतं. माझ्या दुचाकीवर त्यांना जवळच असलेल्या डॉ. शिवशंकर यांच्याकडे नेले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना सोलापुरातील अन्य हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. माझे मित्र डॉ. निर्मल यांना तत्काळ फोन लावून अंबण्णांच्या स्थितीबद्दल माहिती दिली. कॅज्युल्टीत पोहोचल्यानंतर निवासी डॉक्टरांना अंबण्णांच्या स्थितीबद्दल कल्पना दिली. त्यांनी काही इंजेक्शन सांगितले. डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी आमच्या हाती सोपवली. थोड्याच वेळात अंबण्णा शांत झोपी गेले होते. डॉक्टरांनी सांगितलेले इंजेक्शन आम्ही आणून दिले.
डॉक्टरांनी सिस्टरांना अंबण्णांच्या हातापायाला बांधलेली दोरी काढायला सांगितले. निवासी डॉक्टर अंबण्णांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी अंबण्णांच्या अगदी जवळ जाऊन आवाज दिला. तितक्यात अंबण्णा जोरात ओरडून ताकदीने स्वत:चे दोन्ही हात झाडले. ताडकन बेडवर उभे राहून सगळ्यांकडे रागाने पाहू लागले. अंबण्णांचे मजबूत हात निवासी डॉक्टरांच्या गालाला लागल्यामुळे त्यांचा एक गाल प्रचंड सुजला होता. त्यांनी अंबण्णा यांचे हातपाय पुन्हा बांधण्याचे आदेश दिले. डॉ. निर्मल यांनी सांगितलेले इंजेक्शन डॉक्टरांनी दिल्यानंतर अंबण्णांकडून औषधाला उत्तम प्रतिसाद मिळून ते पूर्ववत झाले. चार-पाच दिवसांनी अंबण्णांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. पुनर्तपासणीसाठी ते दोन-तीन वेळा सोलापुरात डॉक्टरांकडे येऊन गेले. तेव्हापासून आजतागायत त्यांची तब्येत अगदी ठणठणीत आहे.
वास्तविक पाहता अंबण्णा यांना जो त्रास झाला तो मेंदूज्वराचा होता. या स्थितीत रुग्ण विक्षिप्तपणे वागतो. अशाप्रसंगी तत्काळ वैद्यकीय उपचार रुग्णास मिळणे अत्यंत गरजेचे असते, असे माझ्या डॉक्टर मित्रांनी सांगितले. नाहीतरी अंबण्णांसारखी शांत, प्रेमळ अशी व्यक्ती असं कसं वागू शकते?, असा प्रश्न सुरुवातीला आम्हाला पडला होता. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे अंबण्णा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मी केवळ निमित्तमात्र होतो. मी केलेली किरकोळ मदत त्या काकूंना खूप मोलाची वाटत होती. म्हणूनच त्यांनी लग्नात मला पाहून कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले. आपण केलेली मदत ही एखाद्याचा जीव वाचवू शकते. म्हणून जेव्हा केव्हा अशी गरजू व्यक्ती आपल्या दृष्टीपथास पडते तेव्हा आपणांकडून जे शक्य होईल ते मदत नि:स्वार्थ भावनेतून केले पाहिजे. अशाप्रकारे केलेल्या मदतीतून मिळणारे आत्मिक समाधान संपूर्ण जगात कुठेही पैशाने विकत मिळत नाही.- राजदत्त रासोलगीकर (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)