सांगोला : ‘झाडी, डोंगार अन् हाटील’मुळे देशभर गाजणाऱ्या आमदार शहाजीबापू पाटलांच्या विरोधात खुद्द त्यांच्या सांगोला तालुक्यातच शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या शिवसेनेच्या जीवावर ते आमदार झाले, त्या पक्षाकडून त्यांना आता कायमचंच डोंगरावर पाठविलं जाईल, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला, तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी बापूंच्या फोटोला काळे फासून निषेध केला. आ. शहाजीबापू पाटील यांच्या निषेधार्थ व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी सांगोला शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने सांगोल्यात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शहाजीबापूंना पुन्हा आमदार होऊ न देण्याचा निर्धार करण्यात आला, तसेच यावेळी महिला आघाडीच्या वतीने आ. शहाजीबापू पाटील यांच्या फोटोला काळे फासून निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.सांगोल्यात शिवसेनेची १,६०० मते आहेत, सांगणाऱ्या शहाजीबापू पाटील यांनी मग शिवसेनेत प्रवेश केला कसा? त्यांना २०१४च्या निवडणुकीत ७६ हजार मते मिळाली कशी, यातून त्यांचा खोटारडेपणा उघडपणे दिसून येत आहे. त्यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून गद्दारी केली आहे, या गद्दाराला जागा दाखवून देतील. आता यापुढे शेकापला उघड उघडपणे पाठिंबा देऊ; पण शहाजीबापूला नाही, असा शिवसैनिकांचा सूर होता
बापूंना डोंगरावर पाठवू! सांगोल्यात शिवसैनिकांचा शेकापला पाठिंबा?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:47 AM