पंढरपुरात बुधवारी व्यापारी संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या संचारबंदीला विरोध करीत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू असे सांगितल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, संचारबंदी अन्याय करणारी आहे. पुणे शहराप्रमाणे निर्बंधामध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिली.
यावेळी पंढरपूर शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहळकर, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, शिवसेनेचे संजय घोडके, रा. पा. कटेकर, संतोष कवडे, विनोद लटके, राजगोपाल भट्टड, सोमनाथ डोंबे, कौस्तुभ गुंडेवार, महावीर गांधी, गणेश पिंपळनेकर उपस्थित होते.
---
जिल्हाधिकाऱ्यांना भेटले शिष्टमंडळ
पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटले. यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. परंतु शंभरकर यांनी दुसऱ्या लाटेपेक्षा तिप्पट रुग्ण संख्या होणाचा धोका आहे. असे सांगून व्यापाऱ्यांनी या स्थितीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
---
चार सुट्ट्या.. संचारबंदी सहा दिवसाचीच
१० दिवसांची संचारबंदी असून त्यात ४ दिवस सुट्या आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने ही संचार फक्त ६ दिवसांची आहे. या १० दिवसांत जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी एकत्रित काम करुन जिल्ह्याचा पॉझिटिव्ह आकडा कमी करण्याचा प्रयत्न करू. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
---
पंढरपूर तहसील कार्यालयासमाेर शहरातील व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. (छाया : सचिन कांबळे)