मोदींकडे बोट करणाºयांनी स्वत:कडे पाहावे : सरोज पांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:23 PM2018-12-07T15:23:48+5:302018-12-07T15:25:36+5:30
सुशीलकुमार शिंदे यांच्या टीकेला दिले उत्तर
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. मोदी यांच्याकडे बोट करणाºयांनी स्वत:कडे चार बोटे वळलेली आहेत हे ध्यान्यात घ्यावे, असे प्रत्युत्तर भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर बैठकीनिमित्त खासदार सरोज पांडे या सोलापूर दौºयावर आल्या होत्या. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खा. सरोज पांडे यांनी पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अमर साबळे, आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अनिवाश कोळी आदी उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. पांडे यांनी पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, असे २०१९ चे मिशन डोळ्यासमोर ठेवून क्लस्टर बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आता पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, असे वक्तव्य केल्याचे निदर्शनाला आणल्यावर खा. पांडे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करण्य्ाांचा कोणालाही नैतिक अधिकार नाही. जे त्यांच्यावर असा आरोप करीत आहेत, त्यांनी पहिल्यापासून स्वत:कडे चार बोटे वळली आहेत हे ध्यान्यात घ्यावे, असे उत्तर दिले.
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गेले तीन दिवस सोलापूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. यादरम्यान विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. बुधवारी तर त्यांनी भाजप मंत्र्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत वक्तव्य केले.