सोलापूर: नियमांचे पालन न करणाऱ्या शहराभोवतीच्या दोन तालुक्यातील सहा आर्केस्ट्रा बारच्या विरोधात ग्रामीण पोलिसांकडून दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. संबंधित आर्केस्ट्रा बार सुरु ठेवताना पोलिसांकडून कायद्यानुसार दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असताना त्यांच्याकडून रात्री १२ ते १ च्या नंतरही ते सुरु ठेवण्याचे प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या संदर्भात सूचना देऊनही वारंवार निमांचे उल्लंघन करण्यात आले. यावर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला होता, असे अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकरांनी स्पष्ट केले.
या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांकडून चार हॉटेलचे परवाने कायमस्वरुपी तर तिघांचे तीन महिन्यांसाठी परवाने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये हॉटेल विजयराज (नान्नज, ता. उत्तर सोलापूर), हॉटेल कॅसिनो (कोंडी, ता. उत्तर सोलापूर), हॉटेल ॲपल (खेड, ता. उ. सोलापूर), हॉटेल गॅलक्सी (कोंडी, ता. उत्तर सोलापूर) यांचे परवाने कायमस्वपी रद्द केले आहेत. तर हॉटेल पुष्पक (कंदलगाव, ता. द. सोलापूर)) आणि हॉटेल न्यू सॅन्ट्रो लाईव्ह (बळेवाडी, ता. बार्शी) यांचा परवाना तीन महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे.