सोलापूर : डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर मुलीला जीवदान मिळाल्याने पित्याने एक ऋण म्हणून शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागास फ्रीज देऊन आपली सेवा अर्पण केली. डोणगाव येथील वैष्णवी शशिकांत चराटे या १० वर्षीय मुलीला अतिविषारी साप चावला होता. तिच्या तोंडाला फेस येत होता. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. घाटे, डॉ. निलोफर बोहरी, डॉ. सुजित दीक्षित, सचिन बंदीछोडे, डॉ. राजेश किरण आणि महेश या टीमने तिच्यावर उपचार करीत तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मुलीला जीवदानानंतर शशिकांत चराटे यांनी डॉक्टरांचे आभार तर मानलेच. शिवाय अतिदक्षता विभागात महत्वाची औषधे ठेवण्यासाठी फ्रीज भेट स्वरुपात दिला. शासकीय रुग्णालयात उपचार नीट होत नाही, अशी नेहमी ओरड असते. वास्तविक सिव्हिलमध्ये योग्य उपचार होत असल्याचे चराटे यांनी सांगितले.