सोलापूर : देवकार्याचा बहाणा करून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती व त्याच्या प्रेयसीसह चौघांना न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी जन्मठेप तर गुन्ह्यात मदत करणाºया चौघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
नरहरी रामदास श्रीमल (३४, श्रीरामनगर, सोलापूर), विनोदा नागनाथ संदुपटला (३३, कुंभारी), महादेवी बसवराज होनराव (३५, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), अंबुबाई भीमराव कनकी (३८, कुंभारी) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बालाजी दत्तात्रय दुस्सा (२३, विनायकनगर), अमर श्रीनिवास वंगारी (२५, कुंभारी), नरेश अंबादास मंत्री (२२, विनायकनगर, कुंभारी), अंबादास किसन ओत्तूर (२१, विनायकनगर) यांना खुनाचा कट रचल्याचा व खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पाच वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, नरहरी श्रीमल व विनोदा संदुपटला यांचे अनैतिक प्रेमसंबंध होते. याची माहिती नरहरी श्रीमल याची पत्नी प्रवलिका हिला समजली. हा प्रकार प्रवलिका हिने माहेरच्या लोकांना सांगितला़ त्यामुळे नरहरी श्रीमल चिडून होता. नरहरीने तिला ठार मारण्यासाठी देवकार्याचा बहाणा करून मोटरसायकलवरून अंबुबाईच्या घरी आणले. घरात विनोदा संदुपटला व तिची मैत्रीण महादेवी होनराव या होत्या. प्रवलिकाला नरहरीने खाली पाडले. अंबुबाईने पाय पकडून विनोदाने फास दिला. महादेवी ही तिच्या अंगावर बसली तर नरहरी याने मानेवर लाथा घालत तिचा जीव मारला होता.
प्रवलिका हिचे प्रेत निळ्या बॅरलमध्ये टाकून छोटा हत्ती (क्र. एम.एच-१३ ए.एन-९११८) मधून विनोदा संदुपटला हिच्या घरी आणले. रात्री ८ वाजता घराच्या कंपाउंडमध्ये खड्डा करून पुरले होते. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत तर आरोपींतर्फे अॅड. एम. आय. कुरापाटी, अॅड. ए. ए. इटकर, अॅड. ए. एन. शेख यांनी काम पाहिले.