सोलापूर : खुन का बदला खुन, या हिंदी चित्रपटातील म्हणी प्रमाणे सत्यवान उर्फ आबा कांबळे (रा. उत्तर कसबा, सोलापूर) याचा खून केल्याप्रकरणी, अटकेत असलेल्या सात जणांना जिल्हा न्यायाधिश-३ एस.आर. शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे (वय ७४ रा. दक्षिण कसबा, पाणीवेस), रविराज दत्तात्रय शिंदे (वय ३२ रा. शाहीर वस्ती), अभिजीत उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे (वय ३२ रा. निराळे वस्ती), प्रशांत उर्फ अप्पा पांडुरंग शिंदे (वय ३६ रा. दक्षिण कसबा, पाणीवेस), निलेश प्रकाश महामुनी (वय ४१ रा. शेळगी), तौसिफ गुड्डूलाल विजापूरे (वय ३३ दक्षिण कसबा, पाणीवेस), विनीत उर्फ ईश्वर भालचंद्र खाणुरे (वय ३१ रा. दक्षिण कसबा, पाणीवेस) असे जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेची हकीकत अशी की, ७ जुलै २०१८ रोजी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास सत्यवान उर्फ आबा कांबळे हा मोबाईल गल्लीतील दर्ग्याजवळ आडोशाला मित्रांसमवे बोलत थांबला होता.
मोटारसायकलवरून निलेश महामुनी व गणेश शिंदे हे दोघे आले, गाडीवरून खाली उतरले व त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने आबा कांबळे याच्या मानेवर वार केला. तेवढ्यात आणखी एका मोटारसायकलवरून तिघे आले, त्यांनी आबा कांबळे याला मारण्याचा प्रयत्न केला. आबा कांबळे तेथून पळून जात असताना, त्याचा पाठलाग केला. तेवढ्यात समोरून गामा पैलवान उर्फ सुरेश अभिमन्यू शिंदे हा त्याच्या साथीदारासह आला. आबा कांबळे खाली पाय घसरून पडला, तेव्हां सर्वांनी रिंगन केले. याला सोडू नका, आब्याला खलास करा असे गामा पैलवान म्हणाला. त्या मारहाणीत आबा कांबळेचा खून झाला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.