जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे. माणसाने केवळ क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नये. त्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगड्याचा पाय व्हावे, अनाथाला पालकसुद्धा व्हावे, दुसर्याला आनंद द्यावा. दुसर्यासाठी जगावे, इतरांना जगू द्यावे. जगता-जगता जीवनाकडे पाहावे, जमेल तेवढे जाणावे या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावे. स्वत:ला विसरून अवैयक्तिक पातळीवरून जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा.
माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने रमावे. अशा जगण्यात जिवाचा गौरव आहे. माणसांजवळ विचारशक्ती आहे. आचारशक्ती आहे, सद्बुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनब्रह्मचे रूप आपण सतत अनुभवत राहू. निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य, चंद्र यांचे उदास्त, सतत खळखळणारे लहानांचे हसणे, पायाशी घोटाळणार्या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलणे केले की वृध्दांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रूपया हातावर ठेवला तर चार पिढ्यांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थनागीत.. अशा अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन किती सुंदर आहे, नाही?
- अजिंक्य काशीद, सोलापूर