आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पत्नीचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप, १ हजार रुपये दंड व पुरावा नष्ट केल्याबाबत ३ वर्षे शिक्षा व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी सुनावली आहे. अप्पा भोजप्पा चव्हाण (वय ३२, रा. तळे हिप्परगा, ता. उ. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणात सविस्तर हकिकत अशी की, १६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वा. पती आरोपी याने स्वतःच्या घरामध्ये पत्नी रेणुका हिला घरगुती कारणावरून तिच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने मारहाण करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरावर पडलेल्या रक्तावर पाणी टाकले व तोंड, हात-पाय पाण्याने धुवून पुरावा नष्ट केला. या प्रकरणी यातील मयत रेणुका हिचे वडील लक्ष्मण संगप्पा काळे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. देवडे यांनी करून आरोपीविरुद्ध मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
यात सरकारपक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी अप्पा भोजप्पा चव्हाण, (वय ३२, रा. तळे हिप्परगा ता. उ. सोलापूर) यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व पुरावा नष्ट केल्याबाबत ३ वर्षे शिक्षा व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास कैदेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारपक्षाच्या वतीने अति सरकारी वकील ॲड. ए. जी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर आरोपीच्या वतीने ॲड. आर. बी. बायस यांनी काम पाहिले, कोर्ट पैरवी म्हणून म.पो.ना.ब.नं. १८६६, एस. एस. वाडे यांनी काम पाहिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"