पंढरपूर : बरणीबंद पेढ्यांमधील लोखंडी तुकडा लहान मुलाच्या पोटात गेल्याने त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ऐन आषाढीच्या तोंडावर पंढरीत ही घटना घडल्यानंतर मुलाच्या पालकाने पेढे उत्पादक कंपनी व विक्रेत्याच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.
गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील विक्रम वासुदेव वाळके याने जयमाता दी फुड प्रॉडक्ट बीड या कंपनीने उत्पादित केलेला बरणीबंद पेढा गुरसाळे येथील कबाडे किराणा स्टोअर्समधून खरेदी केला. हा पेढा पंढरपूर येथील कृष्णा राठी यांनी कबाडे यांना पुरविला होता. पेढा घरी आणल्यानंतर वाळके यांच्या ११ वर्षीय मुलाने तो खाल्ला. मात्र पेढा खाताना त्यामध्ये लोखंडाचा तुकडा असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. पेढ्यातील लोखंडाच्या तुकड्यातील काही भाग त्याच्या पोटातही गेला आहे. ही बाब त्याने आपल्या वडिलांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
विक्रम वाळके यांनी ही गंभीर बाब कंपनीच्या कस्टमर केअरवरील नंबरवर फोन करून त्यांना कळविली असता कंपनीने याबाबत कोणतीही गंभीर दखल घेतली नाही. वाळके यांनी आपल्या मुलास खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. याबाबत त्यांनी पंढरपूर तालुका पोलिसांत कंपनी व विक्रेत्याविरूद्ध तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
अन्नपदार्थांची कसून तपासणी करावी- ऐन आषाढी यात्रा कालावधीत पंढरीत राज्यभरातून अनेक भाविक येतात. त्यासोबत अनेक खाद्यपदार्थांची दुकाने व हॉटेल व्यापारासाठी पंढरपुरात येतात. अन्न व औषध प्रशासनाकडून शहर व तालुक्यातील प्रत्येक दुकानातील नमुना तपासणी करणे शक्य होत नसल्याने त्याचा गैरफायदा घेत अनेक व्यापाºयांकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रीच्या घटना यापूर्वी पंढरपुरात घडल्या आहेत़ त्यातून विषबाधा होण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या धर्तीवर अन्नपदार्थांची कसून तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.