विलास जळकोटकर
प्रत्येकाच्या आयुष्यात यशस्वी वाटचाल करताना गुरूचा वरदहस्त.. त्यांची शिकवण कायम सोबत असते. अगदी असंच काहीसं प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार फरकानं असतं. माझ्या आयुष्यातही वडील अन् त्यांच्या पश्चात वडीलबंधू महेश हे कायम गुरूस्थानी राहिले आहेत. त्यांनीच आपल्या आयुष्याला कलाटणी दिली. ‘अन्याय सहन करू नका, अगदी शांत मार्गाने आपल्या भूमिकेवर ठाम राहा’ ही शिकवण कायम आपल्यासोबत असल्याची प्रांजळ भावना सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांंनी गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
गुरूपौर्णिमेच्या औचित्याने ‘लोकमत’शी मुक्तसंवाद साधताना ते म्हणाले, दैनंदिन जीवनामध्ये सोशल अंगाने पाहण्याचा जो दृष्टिकोन असायला हवा तो माझे वडील आणि २००७ ला ते गेल्यानंतर वडील बंधू महेश यांच्याकडूनच मिळाला. वडील कृषी खात्यामध्ये सेवेत होते. मी आयुष्याच्या वाटेवर जे प्रगतीचे टप्पे पार केले ते वडिलांनी जे संस्कार, मार्गदर्शन केले त्यामुळेच शक्य झाले, असं मी मानतो. ते कृषी खात्यामध्ये कार्यरत होते. त्यांनी नेहमीच आम्हाला सांगितलेलं आजही आठवतं.. ‘वरिष्ठांपेक्षा तुम्ही आपल्या कनिष्ठ सहकाºयांच्या अडचणी कशा सोडविता, त्यांच्याशी रिलेशनशिप कशी ठेवता, जे खºया अर्थाने तुमचं काम पाहत असतात’ हे तत्त्व आजतागायत आपण जपलेलं आहे.
‘माझे प्रथम गुरू म्हणून वडिलांचा नेहमीच अभिमान वाटत राहिला आहे. अगदी सैनिकी स्कूलमध्ये शिकण्यापासून पुढे इंजिनिअरिंग आणि अध्यापन क्षेत्रात शिकताना त्यांनी पदोपदी दिशा दिली. अगदी आता ज्या क्षेत्रात मी आहे त्या पोलीस प्रशासन क्षेत्रात जाण्याचा सल्लाही त्यांचाच. त्यांच्यामुळेच जीवनाकडे विशाल दृष्टिकोन ठेवून कसं राहिलं पाहिजे, हे त्यांच्याकडूनच शिकलो. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना त्रिवार वंदन’ अशा शब्दांत त्यांनी गुरूबद्दलचा आदर व्यक्त केला.
अन्याय सहन करू नकाआदर्श गुरू म्हणून आपल्या वडिलांबद्दलची आठवण सांगताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, ‘एकदा मैदानावर खेळायला गेलो होतो. सोबत भाऊही होता. तेथे काही मुलं आली. ती दादागिरी करून खेळू लागली. आम्ही त्यांच्याशी वितंडवाद नको म्हणून घरी निघून आलो. वडिलांना सारा प्रकार सांगितला. वडील म्हणाले ‘हे बरोबर नाही केलं तुम्ही, अन्याय सहन नाही करायचा. तुम्ही जावा तेथे भांडू नका, त्यांना जाणीव करून द्या’ आम्ही गेलो अन् त्या मुलांना सुनावले तेव्हा ती निघून गेली’ ही बाब तशी छोटीशी होती; पण त्यामागचा विचार फार मोठा होता. हे कायम मनावर कोरलं गेल्याचं ते म्हणाले.