सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनेद्वारे सोलापुरातील जीवनशैली निर्देशांक तपासण्यात येणार आहे. राज्यातील २७ महापालिकांपैकी १८ महापालिकांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून, त्यात सोलापूरचाही समावेश असल्याची माहिती उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.
जीवनशैली निर्देशांकामध्ये शहराची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सुरक्षितता, अर्थव्यवस्था, रोजगार संधी, सार्वजनिक मैदाने, जमिनींचा वापर, ऊर्जा पुरवठा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन,प्रदूषण अशा १५ महत्त्वांच्या मुद्यांवर तपासणी करून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडीत मनपाच्या १८ विभागांतील माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त केलेली कोअर कमिटी महत्त्वाच्या व कमी महत्त्वाच्या अशा ८ मुद्द्यांवर शहराची पाहणी करणार आहे. याबाबत अहवाल तयार एप्रिलअखेर केंद्र शासनाला सादर करावयाचा आहे.
जीवनशैली निर्देशांकाची तपासणी करण्यासाठी २१ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता विविध खात्यांतील अधिकाºयांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये वीज कंपनी, सिंचन, प्रदूषण महामंडळ, परिवहन, राज्य विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त, बांधकाम खात्याचे अधिकारी, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष आदी या बैठकीला हजर राहणार आहेत़ योजनेत असलेल्या १८ शहरांपैकी कोणते शहर कोणत्या गोष्टींसाठी अग्रेसर राहील हे या सर्वेक्षणातून दिसणार आहे.
या सर्वेक्षणाचा अहवाल पुस्तिेकच्या स्वरूपात केेंद्र शासनाला सादर होणार आहे. केंद्र शासन प्रत्येक शहराकडून आलेल्या अहवालावरून कोणत्या शहरासाठी काय आवश्यक असेल त्याप्रमाणे निधी व योजना देण्याबाबत काम करणार आहे.
जीवनशैली निर्देशांक तपासून योजना तयार करण्यासाठी देशातील ११६ शहरे निवडण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील १८ शहरे आहेत. निवड झालेली शहरे १० लाख लोकसंख्येपुढील आहेत. यातून त्या-त्या शहरांची जीवनशैली कशी आहे, हे स्पष्ट होणार असल्याने शासनाला योजना राबविताना उपयोग होणार आहे.- त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त मनपा