पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काही अपक्ष, प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांची अद्याप घोषणा झाली नसली तरी आपणच पक्षाचे उमेदवार असे गृहीत धरून त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली होती. त्यानुसार त्यांनी पंढरपूर शहर, मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील गावागावांमध्ये कुटुंबातील व्यक्ती, कार्यकर्त्यांची फळी तयार करून गावभेट, घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला आहे. सकाळी व रात्री हेच उमेदवार ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन आपली भूमिका मतदारांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यभर वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव त्यानुसार जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमुळे या अपक्ष, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना प्रचार करताना मर्यादा येणार आहेत. निवडणुकीला अवघे २० दिवस शिल्लक असताना त्यामधील दोन दिवस प्रचार करता येणार नसल्याने संभाव्य उमेदवारांची अडचण निर्माण झाली आहे.