सोलापूर : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण वाढत असल्याने या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता घेऊन तात्काळ नियंत्रणासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ सोमवारी पहाटे पाच वाजेपासून लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
कलम १४४ हे जमावबंदी साठी लागू आहे, मात्र या कलमांमध्ये कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पहिल्यांदाच अंत्ययात्रेवर मर्यादा घालण्यात आली आहे. अंत्यविधीला गर्दी होऊ नये याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे़ जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, कुडूर्वाडी, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ या नगरपालिका क्षेत्रात तसेच माढा व माळशिरस या नगरपंचायत क्षेत्रात २३ मार्च रोजी पहाटे ५ ते ३१ मार्चच्या रात्री बारा वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू राहील.
या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशान्वये सर्व सण उत्सव व इतर कार्यक्रमाला बंदी असेल. त्याचबरोबर मेळावे व इतर व्यापारी दुकाने बंद असतील. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण कोणालाही प्रवेश करता येणार नाही. मात्र सरकारी कार्यालय अत्यावश्यक सेवा व या संबंधित व्यक्ती रेल्वेस्टेशन, बसस्थानक या ठिकाणाला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.