लक्ष्मण कांबळे/ कुर्डूवाडी
माढा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं व त्यात निर्माण झालेल्या पाण्याच्या पुरामुळे ११७ गावातील ४३ हजार ९१३ हेक्टर शेतीचे क्षेत्र बाधीत झाले होते. त्याचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई म्हणून २७ कोटी ४८ लाख ७३ हजार १०० रुपयांचा अनुदान निधी दिवाळी पूर्वी माढा तहसीलाला जमा केला होता.व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ते बँकेद्वारे थेट वर्ग करा म्हणून सूचनाही दिल्या होत्या. पण निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेच दिवाळीत सलग सुट्या आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची याद्या फायनल झाल्या नाहीत. त्यातच बँकेला सलग सुट्या आल्याने जरी याद्या झाल्या तरी पैसे खात्यावर वर्ग करणार कोण हा प्रश्न निर्माण झाल्याने आतापर्यंत तहसील कार्यालयात याद्याचा घोळ संपला नाही. त्यामुळे दिवाळी अगोदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून आलेला निधी दिवाळी नंतरही अद्यापपर्यंत खात्यावर मिळाला नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर पैसे लवकर येतील म्हणून बाजारपेठेत उधारीवर घेतलेल्या मालाचे पैसे देण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्ग नुकसान भरपाई कधी खात्यावर जमा होणार म्हणून वाट पाहत बसला आहे.
माढा तालुक्यातील ११७ गावात ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता.त्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील माती देखील विविध प्रकारच्या पिकांबरोबर वाहून गेली होती.त्यात नदी व ओढ्या-नाल्यालगतच्या फळबागा व विविध पिकांचे तर खूप मोठे नुकसान झाले होते.त्यात अनेक घरांची पडझड झाली होती.अनेक जनावरेही मृत्युमुखी पडली होती तर काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्याचे शासकीय स्तरावरील गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांमार्फत संबधीत नुकसानीचेपंचनामे केले होते.यावर विविध संघटनांनी शासनाकडे त्वरित नुकसान भरपाईचे अनुदान द्यावे अशी मागणी सरकारकडे केली होती.त्यामुळे शासनाने माढा तालुक्यातील एकूण नुकसान भरपाई अनुदानाच्या निम्म्या हप्त्यापोटी दिवाळी अगोदर निधी तहसीलाला जमा केला होता.त्यामुळे तहसील खात्यात शासनाकडून २७ कोटी ४८ लाख ७३ हजार १०० रुपयांचा निधी नुकसान भरपाई देण्यासाठी उपलब्ध झाला आहे.
निधी जमा झाल्याबरोबरच तहसीलदार राजेश चव्हाण यांनी नुकसानीत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी करणे सुरू केले होते. व दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमा जमा होतील असे सांगितले होते. परंतु सुट्या आल्याने त्यात तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करता आली नाही.
शेतकऱ्यांना जिरायत व आश्वाशीत सिंचनाखाली प्रतिहेक्टरी १० हजार व बहुवार्षिक पिकांना २५ रुपये हजार हेक्टरी मदत दिली जाणार असून लवकर त्यांच्या बँक खात्यात अनुदान भरपाई पैसे जमा होतील असे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.