माढा : शेतकºयाला कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने संकटात आणले. मात्र दुष्काळात पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या मुक्या जनावराने तारले असे म्हणायला लावणारी घटना माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे घडली आहे.
सर्वसामान्यपणे शेळी ३ किंवा ४ पिल्लांना जन्म देते. मात्र शेतकरी शंकरराव मुळुक यांच्या शेळीने तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे पंचक्रोशीत ही शेळी उत्सुकतेचा विषय बनली आहे. यामध्ये तीन पाट (मादी) व दोन बोकड (नर) आहेत. विशेष म्हणजे सात महिन्यांपूर्वीच शेळीने तीन पाटींना जन्म दिला होता. हा निसर्गाचा चमत्कार व तिला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी शंकर मुळुक यांच्या घरी येऊ लागले आहेत. मात्र पाच पिल्लं अपवादानेच होऊन ही सर्व पिल्लं जिवंत राहत नसल्याचे पाहावयास मिळते, मात्र या शेळीची सर्व पिल्लं जिवंत असून, सुदृढ असल्याने बघ्यांची गर्दी होत आहे.
माझ्याकडील शेळीने यापूर्वी तीन (मादींना) पाटींना जन्म दिला होता. आताही तीन (मादी) पाटी व दोन (नर) बोकडांना जन्म दिला. शेळीपालन फायद्याचे ठरत असून, यापुढे शेळीच्या संख्येत वाढ करणार आहे.- शंकर मुळूक,शेतकरी