सोलापूर : मनपाच्या उद्यान विभागाच्या अखत्यारित असलेल्या ५५ झाडांच्या चिंचा कवडीमोल किमतीने म्हणजे फक्त ८ हजाराला विकल्याची तक्रार माय सोलापूर सामाजिक संघाचे महेश गाडेकर यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.
शहरात मनपाच्या जागेत विविध ठिकाणी चिंचेची ५५ झाडे आहेत. या झाडांना चिंचा लागल्याने उद्यान विभागाने चिंच विक्री करण्याचे ठरविले. या टेंडरला स्थानिक वर्तमानपत्रातून जाहीर प्रसिद्धीकरण न देता ई-टेंडर काढण्यात आले. वैराग येथील जावेद पठाण यांनी हे टेंडर भरले व उद्यान विभागातील अधिकाºयांनी केवळ ८ हजारात हे टेंडर मंजूर केले.
बाजारात चिंचेचा भाव २५० रुपये प्रति किलो तर चिंचुके १०० रुपये किलोप्रमाणे विकले जातात. असे असताना किमान एका झाडाचे फळ ५ हजाराला विकणे अपेक्षित होते. पण उद्यान विभागातील अधिकाºयांनी केवळ १४५ रुपये प्रति झाड याप्रमाणे चिंचफळाची विक्री केली. ई-टेंडर जारी केल्यावर केवळ एकच निविदा आल्यावर किमान तीनवेळा फेरनिविदा काढणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात गोलमाल झाल्याचे गाडेकर म्हटले आहे.
मनपाने चिंचेचा लिलाव केलेली झाडे पुढील ठिकाणी आहेत. सिटी हॉस्पिटल: ५, कोटणीस बाग: १, लेप्रसी कॉलनी: १०, गोल चावडी: १, तुळजापूर रोड स्मशानभूमी: २, कारंबा स्मशानभूमी: १, पुणे नाका स्मशानभूमी: १, माटेबाग: ८, इंद्रभुवन: ६, डफरीन प्रसूतिगृह: २, कै. शंकरराव चव्हाण पुतळा: २, मनपा शाळा क्र. ९: १, हायस्कूल: २, स्कूल बोर्ड: १, प्राणिसंग्रहालय: ६, रूपाभवानी: २, सिद्धेश्वर बाग: ३, डफरीन चौक: १. अशा १५ ठिकाणी कमी फळधारणा झालेली ३३, मध्यम: १०, जादा: ४ आणि काहीच फळधारणा नसलेली ८ झाडे असल्याचे टेंडरमध्ये नमूद केले आहे.
वैरागला टेंडर कसे...- वैरागच्या जावेद पठाण (रा. गवंडी गल्ली) यांनी हे ई-टेंडर कसे पाहिले, याबाबत शंका असल्याचे गाडेकर यांनी म्हटले आहे. उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी संगनमत करून हे टेंडर मॅनेज केल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.