सोलापूर : महापालिकेच्या बंद पडलेल्या नऊ शाळा २९ वर्षे ११ महिने भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
महापालिकेतून रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्तीसोबत शिक्षण आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून ठेवल्या जातात. मात्र अलीकडच्या काही वर्षांत शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था सुधारण्यात पालिकेचे दुर्लक्ष झाले. सर्वसाधारण सभेत काही मोजके नगरसेवक यावर बोलतात. त्यामुळे शाळा बंद पडल्या. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला. आता पालिकेने बंद पडलेल्या शाळा व जागा भाड्याने देण्याची निविदा काढली आहे. यापूर्वी पालिकेने काही लोकांना जागा आणि उद्याने भाड्याने दिली. या जागा आणि उद्यानेही पालिकेच्या ताब्यात परत आलेली नाहीत. आता शाळाच खासगी संस्थांना देण्याचा घाट घालण्यात आला आहे. नऊ शाळांसाठी २७ जानेवारीपर्यंत ई निविदा भरायची आहे.
१८ जानेवारीला प्री. बीड मीटिंग होणार आहे. या शाळा देणार भाड्याने-विडी घरकुल येथील तेलुगू मुलांची शाळा क्र. २, लोधी गल्ली येथील मुलींची शाळा क्र. १४, चौपाड येथील मुलींची शाळा क्र. १९, रामलाल चौक येथील कन्नड मुलांची शाळा क्र. २, सरस्वती चौक येथील माध्यमिक शाळा, मंगळवार पेठेतील उर्दू शाळा क्र. ३ व ४, ढोर गल्ली, शुक्रवार पेठ येथील मुलींची शाळा क्र. २, तुळजापूर वेस येथील मुलींची शाळा क्र. ५, किडवाई चौक येथील मुलींची शाळा क्र. १.