डी. एस. गायकवाड
टेंभुर्णी: माढाविधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्यात एकास एक सरळ लढत झाल्याने प्रथमच हा मतदारसंघ ढवळून निघाला असून, ही निवडणूक लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
२०१४ ची विधानसभानिवडणूक बहुरंगी झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे, काँग्रेसचे कल्याणराव काळे व शिवसेनेचे शिवाजी सावंत यांच्यात सामना रंगला होता. या निवडणुकीत २ लाख ९६ हजार २१३ मतदारांपैकी २ लाख २२ हजार ९८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ७५.२८ टक्के एवढे विक्रमी मतदान केले होते.
या निवडणुकीमध्ये आमदार बबनराव शिंदे ९७, ८०३ मते घेऊन विजयी झाले होते . यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असून, ती ६९.०७ टक्के एवढीच झाली आहे. मतदारांची संख्या मात्र २ लाख ९६ हजार २१३ वरून ३ लाख २६ हजार ७७८ एवढी झाली आहे .एकास एक सरळ लढत होऊनही मतदानाची टक्केवारी वाढण्यापेक्षा ती कमी झाली आहे. याचा फटका कोणास बसणार याची लोक चर्चा करीत आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघातील १३४ गावांपैकी माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे सर्वात जास्त ८६ टक्के एवढे तर माळशिरस तालुक्यातील महाळुंग गट क्रमांक २ येथे ३६ टक्के एवढे सर्वात कमी मतदान झाले. मतदारसंघातील सुमारे ८० गावात ८० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये माढा तालुक्यातील गावांची संख्या जास्त आहे.
का घट झाली?- मतदानाच्या दिवशी संपूर्ण माढा मतदारसंघात पहाटेपासूनच पाऊस चालू होता. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रांसमोरील जागेत विशेषकरून ग्रामीण भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. वाड्यावस्त्यांवरून येणाºया मतदारांना रस्त्यावरील चिखल तुडवत मतदान केंद्र गाठावे लागत होते. मतदान केंद्रावर दुपारनंतर एकदमच वाढलेले मतदार व लांबच लांब लागलेल्या मतदारांच्या रांगा यामुळे मतदानास विलंब लागत होता. यामुळे काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होते तर काहींनी पाऊस व चिखल यामुळे घरात बसणेच पसंत केले होते. यामुळेही काही ठिकाणची मतदान टक्केवारी घटल्याचे चित्र आहे.