मनुष्यप्राण्या तू | जन्माला येऊन |
कीर्ती संपादन | करावीस || २४७.५ ||(अभंगगाथा)
निसर्गात दगड उत्पन्न होतात. त्यांचा उपयोग लिंग घडवण्यासाठी आणि मंदिर बांधण्यासाठी होतो. जन्माला आलेल्या पशूंचा उपयोग शेतीसाठी होतो. निसर्गात उत्पन्न झालेल्या झाडांचा उपयोग कुंपणासाठी होतो. हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना या जगात जन्म घेऊन सत्कीर्ती संपादन करावी. हे न केलेल्या मनुष्याचे जीवन विटलेल्या शिळ्या अन्नाप्रमाणे निरर्थक ठरते.
निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा मानवाला विविध कारणांसाठी उपयोग होतो. ज्यांचा उपयोग सर्वांसाठी होतो त्यांना कीर्ती प्राप्त होते. आपला उपयोग कोणाला होतो का ? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मला सगळ्यांचा उपयोग झाला पाहिजे यावर प्रत्येकाचे आवर्जून लक्ष असते. माझा उपयोग सर्वांना झाला पाहिजे यावर लक्ष असते का ? माझा उपयोग कोणाला झाला नाही तर मला सत्कीर्ती मिळणार नाही. त्यामुळे माझे जीवन विटलेल्या शिळ्या अन्नाप्रमाणे निरर्थक होईल. आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून घ्यायचा की आपले जीवन निरर्थक ठेवायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. संतांचे जीवन सकल मानवांसाठी निरंतर उपयोगी आहे.
जीवनी आपल्या | सत्कीर्ती हवी |त्यासाठी करावी | सत्यकर्मे || १ ||
सिद्धरामे दिली | जीवनाची दिशा |
करू आता आशा | सत्कर्माची || २ ||
सिद्धदास म्हणे | जीवनी येऊन |
घेऊ समजून | सिद्धवचने || ३ ||
- डॉ. अनिल काशीनाथ सर्जे, सोलापूर