राकेश कदम
सोलापूर : घराच्या इंटिरियरमध्ये फर्निचर डिझाइन, पीओपी सिलिंग याला खूप महत्त्व आहे. ही कामे करणारे हजारो परप्रांतीय तरुण जिल्ह्यात कार्यरत आहेत. कुटूंबापासून दूर छोट्याशा जागेत राहून तरुण मुले शेकडो लोकांची घरे सजविण्यासाठी अहोरात्र झटत असतात. सुबक, आकर्षक आणि वेळेवर काम पूर्ण करण्याच्या पध्दतीमुळे शहर आणि जिल्ह्यातील कंत्राटदारही या मंडळींकडून काम करुन घेण्यास प्राधान्य देत आहे.
पीओपी सिंलिंग आणि फर्निचरच्या कामाचा व्यापार उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील कामगारांनी व्यापला आहे. लखनौ (उत्तर प्रदेश) जवळच्या बस्ती गावचे शफीकउल रहमान खान वयाच्या १२ व्या वर्षी आपल्या मामासोबत सोलापुरात आले. मामा पीओपी सिलिंगचे काम करायचे. शिवाय एक बेकरीही होती. एक-दोन वर्षे बेकरीत काम केल्यानंतर शफीक यांनाही सिलिंगच्या कामाची आवड निर्माण झाली. कारागिरीतील हातखंडा पाहून मामांनी प्रोत्साहन दिले.
शहरातील नामांकित कंत्राटदारांनी शफीक यांना काम द्यायला सुरुवात केली. शफीक यांनी नंतर दोन लहान भावांना बोलावून घेतले. शफीक, त्यांचे बंधू मज्जीबूर खान, मतीउल खान यांच्यासह त्यांच्या सहकाºयांनी गेल्या १६ वर्षात सोलापूर शहरासह खेड्यापाड्यातही पीओपी सिलिंगची कामे करुन अनेकांच्या घरांना चारचाँद लावले आहेत. खान कुटूंबीय कल्याण नगरमध्ये एका भाड्याच्या घरात राहतात. सोबत पत्नी, दोन भाउही असतात. आम्ही आता सोलापूरकरच झालो आहोत. गावाकडे दोन बहिणी, आई-वडील असतात. वर्षा-दोन वर्षातून एकदाच गावाकडे जातो, असेही त्यांनी सांगितले.
जोधपूर (राजस्थान) येथील बाबुराव सुतार दहा वर्षांपासून सोलापुरात दयानंद महाविद्यालय परिसरात स्थायिक आहेत. जोधपूर भागात अनेक सुतार कुटूंबीय आहेत. शाळेला जाता-जाता अनेक मुले काम शिकून घेतात. कुटूंबांच्या अडचणींमुळे त्यांना गाव सोडावे लागते. आम्ही आमच्या कुटूंबीयांकडे इकडे आणलेले नाही. एक दोन महिने काम केले की गावाकडे जातो, असेही सुतार यांनी सांगितले.
मुकादम हेरतात कुशल कामगारांना - राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यातील अनेक मुकादम सोलापुरात स्थायिक झाले आहेत. काहींची दुकाने आहेत. गावाकडे गेल्यानंतर आपल्या ओळखीतील होतकरु मुलांना ते हेरतात. त्यांच्या आई-वडिलांना सहा महिने अथवा वर्षभराचे एकवट पैसे दिले जातात. इकडे आणल्यानंतर त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय केली जाते. कामागणिक पैसेही दिले जातात. फर्निचर आणि सिलिंगचे काम करताना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आजारी पडल्यानंतर ओळखपत्राअभावी सरकारी दवाखान्यात जायची अडचण होते. गरीब स्वभावाच्या मुलांना रिकाम टेकड्या स्थानिक तरुणांचा त्रास होतो. पण हा त्रास विसरुन पोटासाठी पुन्हा दिवस चालू होतो, असे आर्किटेक्चर कादीर जमादार यांनी सांगितले.
इंटिरियर डिझायनिंगमध्ये सुबक काम आणि वेळेला खूप महत्त्व असते. स्थानिक माणसे कामाची वेळ पाळत नाहीत. चार दिवस गेले की घरातल्या अडचणी सांगून काम टाकून निघून जातात. परप्रांतीय माणूस अडचणीवेळी निघून जाईल. पण जाताना पर्यायी माणूस देउन जातो. आमच्याकडे काम करणारी माणसे छोट्या घरांमध्ये राहतात. त्यांच्या अडीअडचणी पाहिल्या की पुन्हा मन लावून काम करतात. स्थानिकांचे अनुभव न सांगितलेले बरे. - मनोज खुब्बा, कन्स्पेट इंटिरियर