काशिनाथ वाघमारे
सोलापूर : १९१७ च्या दरम्यान रायचूरहून आलेल्या रोजंदारांना निवारा लाभला तो कोनापुरे चाळीचा़ या वैशिष्ट्यपूर्ण चाळीने आजपर्यंत उपमहापौर, स्थायी आणि परिवहन समिती सभापती आणि ९ नगरसेवक दिले आहेत़ कला, क्रीडा, सांस्कृतिक वारसा जपलेल्या या चाळीने आज शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे़
आंध्रप्रदेशातून आलेल्या तेलुगू समाजाप्रमाणे जवळपास शंभर वर्षांपूर्वी कर्नाटकातील रायचूरहून काही कुटुंब रोजंदारीसाठी सोलापुरात आले़ या कुटुंबांना सर्वप्रथम जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरात कोनापुरे चाळीचा निवारा लाभला़ ४ एकर १ गुंठा क्षेत्रफळावर कोनापुरे मालकांनी त्यांना कच्ची घरे बांधून देऊन भाडेतत्वावर ठेवले़ या रहिवाशांपैकी बरेच एऩजी़ मिल, लक्ष्मी-विष्णू मिल, सोलापूर सूतमिल, यशवंत मिल अशा विविध मिलमध्ये काम करत होते़ काही लोक बांधकामापैकी गिलाव काम करण्यात तरबेज होते़ गिलाव कामगार ही एक ओळख चाळीने दिली आहे़ तसेच महापालिकेत जवळपास शंभर कर्मचारी हे या चाळीतील रहिवासी आहेत़ गिरण्या बंद पडल्यानंतर बेकार झालेले कामगारदेखील गिलाव कामाकडे वळाले़ आज संपूर्ण चाळीतील लोक गिलाव कामगार म्हणून ओळखले जातात़
१८ वर्षांच्या लढाईनंतर हक्काच्या घरात - बरीच वर्षे रोजंदार मजूर कोनापुरे यांच्या चाळीत दहा रुपयांच्या भाडेतत्वावर राहिल्यानंतर त्यांना हक्काच्या घराचा प्रश्न भेडसावू लागला़ १९८५ साली सायबण्णा करगुळे आणि त्यांच्या इतर सहकाºयांनी मिळून हक्काच्या घरासाठी लढाई सुरु केली़ इतिहासात प्रथमच मूळ मालक कोनापुरे यांची खासगी जागा संपादित करुन, आहे ती घरे रोजंदार रहिवाशांना दिली गेली़ २००३ साली ही घरे त्यांच्या मालकीची झाली़ आता या जागेवर पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्याची अनेकांची इच्छा आहे़
चाळीतील जुने कर्तबगार लोक- या चाळीत अनेक कर्तबगार लोक घडले़ पहिले दलितमित्र नरसप्पा म्हेत्रे, माजी उपमहापौर होसमनी महामुनी, बांधकाम व्यावसायिक मल्लेश अलजेंडे, स्व़ रतन तुपळोदकर, अंजन चलवादे, सिद्राम तुपळोदकर, चाळीतून निवडून गेलेले पहिले नगरसेवक नु़ ल़ म्हेत्रे, हेमरेड्डी तुपडे, माजी नगरसेवक सायबण्णा करगुळे, स्थायी समिती सभापती स्व़ हणमंतीताई करगुळे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह ९ नगरसेवक, परिवहन सभापती या चाळीत घडले़ या चाळीत राहणारे रेल्वे टीसी व्हनप्पा कंपली यांनी सोलापूरकरांना सर्वप्रथम आॅर्केस्ट्रा ही थिम दाखवून दिली़ ते उत्तम मेंडोलीन आणि गिटारवादक होते़ संगीताचे धडे घेण्यासाठी अनेक जण या चाळीत यायचे़ या चाळीतील काही क्रीडापटू कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत़
पाच दिवस हनुमान जयंती- पाच दिवस हनुमान जयंती आणि जांबमुनी महाराज रथोत्सव हे या चाळीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य़ देशभरात सर्वत्र एक दिवस हनुमान जयंती असते़ मात्र सोलापुरात कोनापुरे चाळीत आध्यात्मिक कार्यक्रम राबवत पाच दिवस उत्सव साजरा केला जातो़ याबरोबरच गणेशोत्सव आणि इतर उत्सवही येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात़ उत्सव काळात लेझीमचा बहारदार खेळ हे दुसरे वैशिष्ट्य चाळीने जपले आहे़ काँग्रेसचे बाबा करगुळे यांनी जांबमुनी महाराज उत्सवानिमित्त समाजातील गरीब वधू-वरांच्या हितार्थ सामुदायिक विवाह सोहळ्याची प्रथा सुरु केली आहे़
दृष्टिक्षेप
- - चाळीत सुरुवातीला शंभर घरे होती़ आज ६०० घरे आणि जवळपास ८ हजार लोकसंख्या आहे़
- - चाळीमध्ये ७० टक्के मोची समाज अन् ३० टक्के इतर समाजाचे वास्तव्य़
- - २००३ साली झाली हक्काची घरे़