सांगोला : ग्रामीण भागात महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यातील २५३ बचत गटांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून ५ कोटी ४७ लाख रुपयांचा कर्जपुरवठा करून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत महिला बचत गट उत्पादक समूह तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यातून २४ उत्पादक संघ तयार झाले आहेत. १० शेळीपालन उत्पादक तयार झाले आहेत. समूह मूल्यवर्धन संघांतर्गत जवळा, मेथवडे, मांजरी, धायटी, संगेवाडी, वाकी-शिवणे, डोंगरगाव, देवळे, बुरलेवाडी, बुरंगेवाडी या ठिकाणी महिला बचत गटांनी वाटा पद्धतीने व्यवसाय सुरू केला आहे.
उमेद अभियानाकडून एका उत्पादक समूहाला वार्षिक ७ टक्के व्याज दराने २ लाख रुपये कर्ज पुरवठा केला जात असल्याचे तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील यांनी सांगितले
तालुक्यात उमेद अभियान व्यापकपणे राबवण्यासाठी तालुका व्यवस्थापक दीपमाला सोमाणी, गजानन सुतार, सुधीर पिसे, अमोल सावंत, महांतवीर घाडगे, प्रभाग समन्वयक किशोर बिडे, ज्योती राठोड, महेश साठे, प्रशासन सहायक नितीन शिंदे परिश्रम घेत आहेत.
---
पाच ठिकाणी मदर पोल्ट्री युनिट
प्रगती गांडूळ खत उत्पादक समूह बामणी प्रभाग संघामार्फत महूद, कोळा, लोटेवाडी, ढाळेवाडी, डिकसळ अशा पाच ठिकाणी मदर पोल्ट्री युनिट सुरू केले आहेत. यात प्रति युनिट एका दिवसाची एक हजार कोंबडीची पिल्ले दिली जातात. त्यानंतर एक महिना संगोपन करून डीपी क्रॉस व कावेरी या जातीची पिल्ले महिलांना विक्री करतात. प्रभाग संघाला खर्च वजा करता ६ हजार रुपये नफा मिळतो.
---
सांगोला पंचायत समितीने उमेद अभियानांतर्गत तालुक्यात १ हजार ८२९ बचतगट कार्यरत आहेत. तसेच ८६ ग्रामसंघासह ७ प्रभाग संघाची निर्मिती केली आहे. उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी बँकामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- दीपमला सोमाणी
तालुका व्यवस्थापक