महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यातील २५३ बचत गटांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून ५ कोटी ४७ लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला. यातून गरीब, गरजू विधवा, परित्यक्ता महिलांचे सक्षमीकरण होत असल्याची माहिती तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील यांनी दिली.
तालुक्यात १ हजार ८२९ बचतगट कार्यरत आहेत, तर ८६ ग्रामसंघासह ७ प्रभाग संघाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत महिला बचत गट उत्पादक समूह तयार करण्यावर भर दिला आहे. यातून २४ उत्पादक संघ तयार झाले आहेत, तर १० शेळीपालन उत्पादक समूह मूल्यवर्धन संघांतर्गत जवळा, मेथवडे, मांजरी, धायटी, संगेवाडी, वाकी-शिवणे, डोंगरगाव, देवळे, बुरलेवाडी, बुरंगेवाडी या ठिकाणी महिला बचत गटांनी वाटा पद्धतीने व्यवसाय सुरू केले आहे.
या अभियानात एका उत्पादक समूहाला वार्षिक ७ टक्के व्याज दराने २ लाख रुपये कर्ज पुरवठा केला जातो. या कर्जाची महिला बचत गटांना प्रभाग संघाकडे परतफेड करावयाची आहे. उमेद अभियान व्यापकपणे राबवण्यासाठी तालुका व्यवस्थापक दीपमाला सोमाणी, गजानन सुतार, सुधीर पिसे, अमोल सावंत, महांतवीर घाडगे, प्रभाग समन्वयक किशोर बिडे, ज्योती राठोड, महेश साठे, प्रशासन सहा. नितीन शिंदे हे प्रयत्नशील आहेत.