राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या व शेकापची सत्ता असलेल्या महूद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीवर आपल्याच गटाची सत्ता यावी म्हणून ग्रामविकास आघाडी व महाविकास आघाडीकडून एकास एक उमेदवार उभे करून रंगत आणली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेकाप व राष्ट्रवादीने युती करून एकत्र निवडणूक लढविल्याने १७ पैकी ९ जागा जिंकून वर्चस्व मिळवले होते. तर विरोधी शिवसेना आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले होते.
यंदा मात्र शेकापने शिवसेनेच्या एका गटासह आरपीआयसोबत युती करून ग्रामविकास आघाडी तर शिवसेना- राष्ट्रवादी, काँग्रेस (आय) यांची महाविकास आघाडी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. त्यामुळे महूद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आजी-माजी लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रभाग क्र. २ चे उमेदवार विद्यमान उपसरपंच दिलीप नागणे, भाग्यश्री बाजारे, जुबेदा मुजावर व ग्रामविकास आघाडी व शेकापच्या विद्यमान सदस्य समीर ऊर्फ गब्बर मुलाणी, राजश्री देशमुख व वर्षा महाजन, तर प्रभाग क्र. ६ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कुंडलिक पवार, संगीता ढाळे, गणेश कांबळे, तर ग्रामविकास आघाडीचे संजय पाटील, आशाबाई कांबळे, मालन आटपाडकर यांच्यात खरी चुरस आहे. प्रभाग क्र. १, ३, ४ व ५ मध्ये महाविकास आघाडी व ग्रामविकास आघाडीकडून एकास एक तगडे उमेदवार दिल्याने याही लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची घालमेल
प्रचारासाठी आता पाच दिवस उरले असून उमेदवार आपापल्या प्रभागनिहाय होम टू होम मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी- गाठी घेत आहेत. मतदार मात्र घरी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला औंदा काळजी करू नका, म्या तुमच्या सोबतच हाय, असे आश्वासन देत असले तरी दिवसा वेगळी आणि रात्रीची वेगळी चर्चा करीत असल्यामुळे मतांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची चांगलीच घालमेल होत आहे.
परमिट रूम, हॉटेल, ढाबे फुल
ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत स्थानिक गावपुढारी, कार्यकर्ते, उमेदवार मतदारांना खुश करण्यासाठी दिवसा चहा, नाश्ता तर रात्री ओल्या, सुक्या पार्ट्या देत असल्याने मतदारराजा मात्र दोन्हींकडून ढोल वाजवीत आहेत. सध्या महूद परिसरातील परमिट रूम, ढाबे, हॉटेल्समधून पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर मतदारांच्या जेवणावळीने फुलल्याचे दिसून येत आहे.