पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुख दर्शनासाठी स्थानिक नागरिकांना ऑनलाईन बुकींग पासची अट रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
नागरिकांकडून विठ्ठलाचे दर्शन उपलब्ध देण्याची पंढरपूर शहरातील स्थानिक मागणी होत आहे. ही बाब विचारात घेवून पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना दिपावलीच्या काळात एक दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन उपलब्ध करून दिले होते. तसेच ऑनलाईन बुकींग पास घेण्याची अट ही एक दिवसासाठी रद्द करण्यात आली होती. यामुळें दिवसभरात ६ हजार नागरिकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलावड यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे ५ डिसेंबर पासून स्थानिक नागरिकांना सकाळी ६ ते ७ यावेळेत विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेता येत आहे. दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग पासची गरज नसणार आहे. पत्र पंढरपूरचा रहिवाशी असल्याबाबतचा पुरावा आवश्यक असणार आहे. तसेच त्यांना कासार घाट येथील दर्शन रांगेतून प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर ६५ वर्षापूढील व्यक्ती, १० वर्षाखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.