सोलापूर : वातानुकूलित एस. टी. गाड्या म्हणजे जणू बंदिस्त असतात. अशा गाड्यांमधून प्रवास करताना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, ही भीती बाळगून प्रवाशांनी साध्या एस. टी. गाड्यांमधून प्रवास करण्यावर भर दिला आहे. यामुळे शिवशाही एस. टी. गाड्यांचे उत्पन्न घटले आहे. पुण्यातील लॉकडाऊनचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराला बसला आहे.
मनपा प्रशासनाच्या वतीने प्रवासी वाहनांच्या आसन क्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी असणे बंधनकारक केले आहे. यानुसार राज्य परिवहन महामंडळ सोलापूर आगारातील गाड्यांमध्ये बावीस प्रवाशांवर फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे, तसेच सोलापूर विभागातून पुणे मार्गावर अनेक गाड्या सोडण्यात येतात. यात शिवशाही गाड्यांची संख्याही जास्त आहे; पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे पुण्यामध्ये निर्बंध घालण्यात आलेले आहेत. परिणामी याचा मोठा फटका एसटी प्रशासनाच्या गाड्यांना बसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे मार्गावरील दैनंदिन फेऱ्या सोलापूर आगाराला रद्द कराव्या लागत आहेत. ज्या गाड्या सुरू आहेत त्या गाड्यांनाही प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सोलापूर आगाराचे दिवसाकाठीचे उत्पन्न पंधरा लाखांवरून सध्या सात ते आठ लाखांवर येऊन ठेपले आहे. सोबतच शिवशाही गाड्या या पूर्णतः बंदिस्त असलेल्या गाड्या आहेत. यामुळे अनेक प्रवाशांनी बंदिस्त गाड्यांमध्ये प्रवास करण्यापेक्षा एसटीच्या लालपरी, विठाई आदी गाड्यांमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.
सोलापूर आगारात एकूण २२ शिवशाही गाड्या आहेत. यातील दहा गाड्या पुणे मार्गावर आणि आठ गाड्या हैदराबाद मार्गावर सोडण्यात येतात. उर्वरित गाड्या इतर मार्गांवर सोडण्यात येतात. पुणे हैदराबाद या दोन्ही मार्गांवर शिवशाहीला चांगला प्रतिसाद मिळतो; पण गेल्या काही दिवसांपासून प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे. तसेच कोरोनाच्या भीतीपोटी अनेक प्रवासी वातानुकूलित असलेल्या शिवशाही गाड्यांमधून प्रवास करणे टाळत असल्याचे काही प्रवाशांची मत आहे; पण इतर मार्गांच्या तुलनेत या मार्गांवरील उत्पन्न बरे असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.