रवींद्र देशमुख
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसकडील माढ्याचा गड राखण्यासाठी सेनापती अर्थात पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्यास हिरवा कंदील दाखविला होता; पण आज पुण्यात बारामती हॉस्टेलवर झालेल्या बैठकीत पवारांनी माढ्याच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनाच लढत द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांची उमेदवारी येत्या दोन दिवसात जाहीर होईल, असे राष्टÑवादीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मोहिते-पाटील विरोधक असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी देणे योग्य होईल, अशी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.
माढ्यातील राष्टÑवादीअंतर्गत राजकारणात मोहिते-पाटील यांना गेल्या तीन-चार वर्षांपासून शह देण्यात येत आहे. या स्थितीत हा गड राखणे राष्टÑवादीसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे दीड महिन्यापूर्वी पुण्यातच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी माढ्यातून लढण्यासाठी पवारांना आग्रह केला होता. त्यानंतर आठवडाभरातच पवार माढा मतदारसंघाच्या दौºयावर आले. एका सभेत उपस्थित जनसमुदायाने त्यांना माढ्यात पुन्हा लढण्याची साद घातली. ‘तुमचा होकार असेल, तर मी नाही का म्हणू?’ असा प्रश्न विचारत पवारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला अन् नक्की मानलं गेलं की, माढ्यातून पवारच लढणार! पवार त्यानंतरही माढ्याच्या दौºयावर आले.
फलटणला सभा घेतली; पण त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत धुसफूस दिसून आली अन् पवार कदाचित लढणार नाहीत, असे राष्टÑवादी समर्थकांमधून संकेत मिळू लागले. आज सकाळी बारामती हॉस्टेलवर झालेल्या बैठकीत मात्र पवारांनी निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. या बैठकीस खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, कल्याणराव काळे, आमदार भारत भालके आणि रश्मी बागल-कोलते उपस्थित होते. पवारांनी आज माढ्यातून आपली उमेदवारी नसल्याचे जाहीर केल्यानंतर मोहिते-पाटील समर्थकांनी आपल्या नेत्याला लढण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नजीकच्या समर्थकांनी तर विजयदादाच उमेदवार असल्याचे खात्रीदायकरित्या सांगितले. अर्थात याबाबतचा निर्णय आज सायंकाळी आणि उद्या होणाºया बैठकीत घेतला जाणार आहे. त्यानंतर जाहीर होणाºया उमेदवारांच्या यादीद्वारे विजयदादांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असेही सांगण्यात आले.
भाजपचा संजय शिंदे यांना आग्रह!- माढ्यात पवार लढणार असतील तर सहकारमंत्री सुभाष देशमुख पारंपरिकपणे त्यांना आव्हान देणार होते; पण विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्टÑवादी उमेदवारी देणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने या स्थितीत त्यांचे राजकीय विरोधक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि संजय शिंदे यांना उमेदवारी घेण्यासाठी भाजप आग्रह करीत असल्याचे सूत्राने सांगितले. संजय शिंदे यांचा कल मात्र करमाळा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याचाच आहे. त्यांना लोकसभेसाठीच्या उमेदवारीत स्वारस्य नाही, हे त्यांनीही यापूर्वी स्पष्ट केलेले आहे.