Lok Sabha Election 2019; संभाजी ब्रिगेडचे माढा, सोलापूरचे उमेदवार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:01 PM2019-03-14T13:01:26+5:302019-03-14T13:04:05+5:30
पंढरपूर : काँग्रेसबरोबर आम्ही बोलणी केली, पण आम्हाला त्यांनी गृहित धरलेच नाही, त्यामुळे संभाजी ब्रिगेड आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ...
पंढरपूर : काँग्रेसबरोबर आम्ही बोलणी केली, पण आम्हाला त्यांनी गृहित धरलेच नाही, त्यामुळे संभाजी ब्रिगेड आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे़ माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा आज (बुधवारी) जाहीर करण्यात आली. माढ्यातून विश्वंभर काशीद तर सोलापूर राखीव मतदारसंघातून श्रीमंत मस्के हे रिंगणात उतरणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या काळात फक्त फसवणूक करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे आम्ही निवडणूक रिंगणात उतरत आहोत. काँग्रेसबरोबर आमची बोलणी सुरु होती. मात्र काँग्रेस आम्हाला झुलवत ठेवत असल्याने आम्ही स्वबळावर १८ जागा लढण्याची तयारी केल्याचे घाडगे म्हणाले.
मूळचे सांगोला तालुक्यातील असलेले विश्वंभर काशीद हे जलसंपदा विभागातील निवृत्त उपअभियंता आहेत़ सोलापूरचे संभाव्य उमेदवार श्रीमंत मस्के हे पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. यावेळी विश्वंभर काशीद यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
या पत्रकार परिषदेला पंढरपूरचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, समाधान क्षीरसागर, हनुमंत साळुंखे उपस्थित होते.
कोणाला बसणार संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांचा फटका
संभाजी ब्रिगेडच्या वतीने माढा लोकसभा निवडणुकीसाठी सांगोल्याचे विश्वंभर काशिद तर सोलापूर लोकसभेसाठी पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी जाहीर केली़ या संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांचा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.
विश्वंभर काशिद हे मूळचे सांगोला तालुक्यातील असून, ते जलसंपदा विभागातील निवृत्त उपअभियंता आहेत़ शासकीय कामातून त्यांचा थेट जनतेशी संपर्क आलेला आहे़ मात्र आता निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली आहे़ अधिकारी असताना नागरिक ‘साहेब, साहेब’ म्हणून काम करून घेण्यासाठी मागे लागत होते़ निवडणुकीत मतदार ‘राजा’ असतो़ त्यामुळे त्यांना आता मतदार साथ देतील का? जर दिली तर त्या मतांचा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसेल हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.
श्रीमंत मस्के हे मूळचे गादेगावचे असून, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती होते. ते राष्ट्रवादीकडून निवडून येऊन परिचारक गटाकडून सभापतीपदाची संधी मिळाली होती़ आता त्यांनी थेट लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे, तेही सोलापूर लोकसभेसाठी़ सोलापूरसाठी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे़ भाजपकडून अद्याप जाहीर झालेली नाही़ शिवाय बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: सोलापुरातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे़ त्यामुळे तिरंगी लढत होत असताना आता संभाजी ब्रिगेडने उमेदवारी जाहीर केल्यामुळे चौरंगी लढत होत असून, श्रीमंत मस्के यांच्या उमेदवारीचा कोणाला फटका बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.