आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर एका संतप्त तरूणाने अचानकपणे मतदान केंद्रात प्रवेश करीत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच ईव्हीएम मशीन हातात घेऊन त्यावर पेट्रोल ओतून ईव्हीएम पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला होता.
दरम्यान, मतदान केंद्रावरील अधिकार्यांनी संबंधित तरूणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या तरूणाला सांगोला पेालिस ठाण्यात आणले. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बागलवाडी येथील बुथ क्रमांक ८६ वर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक तरूण घोषणाबाजी करीत मतदान केंद्रात घुसला. त्यानंतर त्याने मतदान यंत्र हातात घेत पेट्रोल ओतले अन् पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मशीन बंद पडली. या घटनेमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबविण्यात आली. उपस्थित मतदान केंद्रावरील पोलिसांनी त्या तरूणास ताब्यात घेतले. त्यानंतर तासाभरात दुसरे मतदान यंत्र मशीन आणून पुन्हा पहिल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू केली.