राकेश कदम, साेलापूर: भाजपाने साेलापूर लाेकसभा मतदारसंघातून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली. मतदारसंघातील भाजपा आमदारांनी सातपुते यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. मात्र माजी मंत्री लक्ष्मणराव ढाेबळे यांची कन्या काेमल ढाेबळे-साळुंखे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वेगळेच संकेत दिले आहेत. काेमल ढाेबळे यांचा साेशल मिडीयाचा स्टेटस चर्चेचा विषय आहे.
साेलापूर मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते यांच्यासह माजी खासदार अमर साबळे, काेमल ढाेबळे, सनदी अधिकारी भारत वाघमारे, उद्याेजक मिलिंद कांबळे यांची नावे चर्चेत हाेती. साेलापूर मतदारसंघात भाजपचे चार आमदार आहेत. भाजपने मागील दाेन लाेकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका भाजपच्या ताब्यात हाेती. तरीही भाजपला साेलापूरचा उमेदवार जाहीर करायला वेळ लागला. इच्छुकांनी जाेरदार माेर्चेबांधणी केली हाेती. अखेर रविवारी रात्री भाजपने आमदार राम सातपुते यांची उमेदवारी केली. यावर काेमल ढाेबळे यांनी साेशल मिडीयावरून एक संदेश दिला आहे. ढाेबळे म्हणतात, ‘मनासारखा उमेदवार नसेल तर नाेटा समाेरचे बटन दाबा. पण मतदानाचा हक्क नक्की बजावा’. या स्टेटस साेबत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा फाेटाेही जाेडला आहे.