सोलापूर - मनसेच्या सभा खर्चाचा हिशोब मागण्यापेक्षा पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या, त्याचा हिशोब करावा. रोज नवीन नवीन गोष्टी येतात, अन् मागचं सगळं लोक विसरून जातात. देशभरात भाषण करताना जी स्वप्न दाखवली गेली त्याबद्दल पंतप्रधान एकही शब्द काढायला तयार नाही अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
नांदेडनंतर सोलापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा झाली. या जाहीरसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केले. त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाकडून मनसेच्या सभांचा हिशोब मागण्यात आला त्याचा जोरदार समाचार घेतला.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या जाहिरातींवर नरेंद्र मोदी सरकारने 4880 कोटी रुपये खर्च केले. मेक इन इंडियाचं काय झालं? स्मार्ट सिटी काय झालं? नाशिक महापालिका आणि उद्योगपती यांच्या पैशातून नाशिकमध्ये मनसेच्या काळात जी कामं केली ती स्मार्ट सिटीत दाखवली जात आहे. तीस वर्षानंतर देशात नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळालं, तुम्ही सांगितलेल्या स्वप्नावर लोकांनी मतं दिली, काळांतराने लक्षात येतं की नरेंद्र मोदी देशाची खोटं बोलले. जे तुम्ही बोललात त्याबद्दल अवाक्षरंही काढलं जात नाही असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
पंतप्रधानांना झटका आला आणि एका रात्रीत नोटबंदीचा निर्णय केला. देशातील साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ वर्षांपूर्वी जी दाखवलेली स्वप्न आहेत त्याविषयी बोलत नाहीयेत तर बोलत काय आहेत तर पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या जीवावर मतं मागत आहेत, ऐअरस्ट्राईकच्या जीवावर मतं मागत आहेत असं राज ठाकरेंनी सांगितले.
त्याचसोबत आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनी यांनी लोकांना जातीपातीत, धार्मिक गोष्टीत गुंतवून ठेवायचं आहे. आर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षण, दरवर्षी २ कोटी रोजगारांना देण्याचं आश्वासन दिलं याचं झालं काय? आरक्षणाचा फायदा फक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये पण सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.