आयुष्यात तडजोड महत्त्वाचीच असते. अशी तडजोड फक्त दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोकअदालतमध्ये होते. काल असाच एक महत्त्वपूर्ण दावा प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले. हे प्रकरण एक, दोन व्यक्तींमधील नव्हते, तर दोन-तीन गावांच्या मधील होते. सन-२०१३ मध्ये केत्तुर-पोमलवाडीचे ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून रस्ता व पूल बांधायचे ठरविले. परंतु, हिंगणी, गुलमरवाडी, भगतवाडी येथील ग्रामस्थांनी याला विरोध केला. हे प्रकरण पुढे जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयात गेले. वास्तविक, दोन्हीकडील गावांची मागणी योग्य होती. केत्तूर-पोमलवाडीकरांना रस्ता व पुलांची आवश्यकता होती, तर हिंगणी व अन्य गावांच्या लोकांना शेतीच्या पाण्याची पुढे या प्रकरणात नामदार हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाला स्पष्ट निर्देश देऊन रस्ता व पुलाचे पक्क्या व मजबूत कामास शासनाने तातडीने निधी द्यावा, असे बजावले. आज या ठिकाणी असणारे पूल व रस्त्याची कामे पूर्ण होऊन तेथील शेतकऱ्यांची पाण्याची समस्यादेखील मिटली. गावागावांतील वाद पराकोटीला गेले होते. विकासात्मक कामे झाल्यामुळे गावागावांतील वादविवाद मिटलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण रविवारी लोकअदालतमध्ये तडजोडीने मिटले आहे. यावेळी केत्तूर, पोमलवाडीच्या वतीने ॲड. राजेश दिवाण, ॲड. बळवंत राऊत, ॲड. शार्दुल दिवाण तर हिंगणी व इतर गावांचे वतीने ॲड. शेळके, ॲड. चवरे यांनी तडजोडीकामी सहकार्य केले. यावेळी करमाळ्याचे न्यायाधीश प्रशांत घोडके, न्यायाधीश शिवरात्री यांनी उपस्थित गावाच्या लोकांना तडजोडीकामी मार्गदर्शन केले व तडजोडीबद्दल अभिनंदन केले. यावेळी संग्राम पाटील, ॲड. अजित विघ्ने, विनोद बाबर, रामभाऊ जाधव, लक्ष्मण दडस व अन्य प्रतिनिधींनी समझोता घडविला आहे.
लोकन्यायालयात असाही चमत्कार, व्यक्तीचा नव्हे, तर गावांचा दावा मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:23 AM