संताजी शिंदे, सोलापूर: शहरातील लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला असून, यामध्ये २५ उत्सव मंडळांनी सहभाग घेतला आहे.
मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष जयवंत सलगर, उपाध्यक्ष संदीप जाधव, खजिनदार आंबा शेळके, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, राजन जाधव, पत्रा तालीम उत्सव मंडळाचे अध्यक्ष ओंकार जाधव, माजी महापौर पद्माकर काळे आदी मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनी पारंपारिक नृत्य सादर करत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. ढोल ताशाच्या आवाजामध्ये विविध मंडळांकडून लेझीम, झांज नृत्य सादर केले जात होते. लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाकडून काढण्यात येणारी भव्य यांनी दिव्य अशी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या कडेला गर्दी केली होती. मध्यवर्तीच्या पत्रा तालमीच्या मानाचा पंजोबा गणपतीची मिरवणूक सर्वांत शेवटी असून दर्शनासाठी लोक गर्दी करत आहेत.