शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : यावर्षी पावसाळ्यात अल्प पाऊस पडला़ चला म्हटले आपल्याकडे थोडेसे पाणी आहे. कांद्याला दरही चांगला आहे. कांदा लावू म्हणून दोन एकरावर कांदा लावला़ खते टाकून दुहीच्या फवारण्या करून तो चांगल्या पद्धतीने जोपासला. कांदा काढायला आला आणि इकडे परतीचा मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली़ हा पाऊस कमी की काय म्हणून २० आॅक्टोबरला चांदणी नदीला मोठे पाणी आले व हे सर्व पाणी कांद्याच्या पिकात शिरले. संपूर्ण कांदा हा जागेवरच नासला. डोळ्यात अश्रू आणत कांदलगावच्या बालाजी शिनगारे या शेतकºयानं आपली व्यथा सांगितली.
बालाजी यांना जेमतेम अडीच एकर जमीऩ दरवर्षी ते कांदा, तूर अशा पिकांचे उत्पादन घेतात़ यावर्षी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने कांदा जोपासला होता़ यंदा कांद्याला दरही चांगला होता़ चांगले पैसे झाले असते. मात्र नियतीला ते मान्य नसावे़ आम्हाला परतीचा पाऊस एवढा पडेल, असे कधीच वाटले नव्हते़ मात्र तो इतका पडला की आमचे मोठे नुकसान करून गेला.
ज्यावेळी आम्ही शिनगारे यांच्या शेतात गेला तेव्हा ते कांद्याच्या पिकात अक्षरश: धाय मोकलून रडत होते़ आमचे इकडे नुकसान झालंय अन् या पुढाºयांना सरकारचे पडलंय असे म्हणत ते शेतातील एक-एक कांदा उपटून दाखवत होते. तेव्हा प्रत्येक कांदा हा नासलेला दिसत होता़ वरून पात तर हिरवीगार दिसत होती़ मात्र आतून कांदा जादा पाणी लागल्याने नासून गेला होता.
सरकारच्या नावाने खडे...- मुख्यमंत्री तर कोणीही होईल हो, पण एक दिवसाचा शेतकरी होऊन पाहा, असे म्हणून सरकारच्या नावाने खडे फोडले़ शिनगारे यांना या कांद्यापासून एक रुपयाचे देखील उत्पन्न मिळणे शक्य नाही़ बार्शी तालुक्यात कांदा आणि सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ प्रशासनही आता कुठे हलले असून, पंचनामे करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे, बघूया कधी मदत मिळतेय, अशी बोलकी प्रतिक्रिया बालाजी शिनगारे यांनी व्यक्त केली.