अरुण बारसकर
सोलापूर: टँकरच्या पाण्याने रोप जोपासले, तुटपुंज्या पाण्यावर कांद्याची लागवड केली, कधी रिमझिम तर कधी जोराचा पाऊस पडल्याने कांदा पीक जोमात आले. अन् आॅक्टोबरमध्ये महिनाभर पावसाची संततधार सुरू झाली. आता रानमसलेकरांना डोळ्यात पाणी आणून सडलेला कांदा पाहण्याची वेळ आली आहे.
रानमसले गावात प्रामुख्याने कांदा व ज्वारी हीच पिके घेतली जातात. यंदाही अकराशेहून अधिक एकरावर कांदा लागवड झाली आहे. कांद्याचे गाव अशी ओळख असलेल्या गावातील अतुल गरड, पांडुरंग शिंदे, सोन्याबापू गरड, नागनाथ चव्हाण, शहाजी गरड, शिवाजी करंडे, हणुमंत गरड या शेतकºयांच्या कांद्याचे पीक पाहिले असता पावसाचे परिणाम काय असू शकतात, हे लक्षात येते.
गावाची एकही दिशा अशी नाही की तेथे कांदा दिसत नाही. मात्र यावर्षी संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात पाऊस पडत राहिल्याने कांदा पाण्यातच नासू लागल्याचे पाहण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
पंचनामे अन् धो..धो पाऊस- सोमवारी रानमसले गावात तलाठी एस.ए. गवळी, कृषी सहायक सुवर्णा नरगिरे हे बांधावर जाऊन कांदा नुकसानीचे पंचानामे करीत होते. त्यातच दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. नको..नको.. म्हणण्याची वेळ आली असताना सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा पंचनाम्याला व्यत्यय आला. मात्र रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे पंचनामे अंधार पडेपर्यंत कर्मचाºयांनी केले.