लोकमत सडेतोड ; अमर साबळेंची कबुली, ‘संधी मिळाल्यास सोलापुरात उभारणार’; लोकसभेसाठी आमच्याकडे शिंदे फॅमिलीचा ‘डेटा’ही तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:52 AM2019-01-18T10:52:22+5:302019-01-18T10:55:25+5:30
सोलापूर : बारामतीतील राज्यसभेचे खासदार अमर साबळे ‘लोकमत भवन’मध्ये आले. सुरुवातीला ‘नाहीऽऽ नाहीऽऽ’ म्हणणाºया साबळेंनी ‘लोकमत चमू’च्या आडव्या-तिडव्या प्रश्नांच्या ...
सोलापूर : बारामतीतील राज्यसभेचे खासदार अमर साबळे ‘लोकमत भवन’मध्ये आले. सुरुवातीला ‘नाहीऽऽ नाहीऽऽ’ म्हणणाºया साबळेंनी ‘लोकमत चमू’च्या आडव्या-तिडव्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देताना अखेर कबुली दिलीच. ‘होय.. पक्षानं संधी दिली तर मी सोलापूरलोकसभा निवडणुक नक्की लढवेन. तसेच समोरील विरोधक सुशीलकुमार शिंदे यांच्या फॅमिलीचा लेखाजोखा अर्थात डेटा आपल्याकडे तयार आहे,’ हे गुपितही त्यांनी फोडले.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अमर साबळे यांनी मंगळवारी सायंकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. लोकसभेची संभाव्य उमेदवारी, त्या काळात उपस्थित होणारे प्रश्न यासंदर्भात साबळे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, वीरभद्र बसवंती, अमोल गायकवाड, हेमंत पिंगळे आदी उपस्थित होते.
प्रश्न : सोलापूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून तुमचा वावर आहे. तुमची उमेदवारी निश्चित झाली आहे का?
उत्तर : सोलापूर लोकसभा निवडणूक आणि सोलापूरच्या राजकीय विषयाचा प्रभारी म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. माझी काम करण्याची पद्धत भाजपच्या संस्काराप्रमाणे आहे. १५ वर्षे मी गोपीनाथ मुंडे यांचा प्रचार प्रमुख होतो. एकदा पिशवी घेऊन घराबाहेर पडले की तीन-तीन महिने परत यायचे नाही. एकदा कामात झोकून दिलं की झोकून दिलं. त्यानुसार मी सध्या काम करतोय. पार्लमेंटरी बोर्डात लोकसभेच्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर होते.
प्रश्न : कामाची पद्धत ही तुमची एकट्याची आहे की भाजपमधील प्रत्येकाची आहे?
उत्तर : भाजपमधील प्रत्येक कार्यकर्त्याने अशा पद्धतीने काम करावे, असे वाटत असते.
प्रश्न : मग सोलापूरचे दोन मंत्री, खासदार तुमच्यासारखंच काम करतात का?
उत्तर : (थोडंसं थांबून...) मी काय काम करतोय, ते तुम्हाला सांगतोय. ते त्यांच्या स्तरावर काम करत आहेत. पण मी मायक्रो स्तरावर काम करतो. मी येतो, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांना भेटतो. बैठकांचे प्लॅनिंग करतो. परवा मोदींच्या सभेनिमित्त एका दिवसात आठ बैठका केल्या.
प्रश्न : तुम्हाला जेवढी पक्षाची काळजी आहे, तेवढी पक्षाच्या विद्यमान खासदारांना आहे का?
उत्तर : ते पण काळजी घेत असतील. त्यांचा संपर्क असेल.
प्रश्न : मुंबई, दिल्लीत बसून कशी काळजी घेणार?
उत्तर : (पुन्हा थोडंसं थांबून...) त्यांची जबाबदारी वाहणारा माणूस इथं असेल की...! मी प्रभारी म्हणून आलोय. मी माझं काम करतोय. तुम्हाला सांगतो १५ वर्षांपूर्वी अशीच माझ्या नावाची चर्चा पंढरपूर लोकसभा मतदारसंघासाठी होती. पण अन्य उमेदवाराला उमेदवारी दिली गेली आणि प्रचार प्रमुख मला नेमलं.
प्रश्न : निवडणुकीत उमेदवाराची कामगिरी हा मुद्दा असतो. बनसोडे यांच्या कामगिरीबद्दल तुमचं मत काय?
उत्तर : चांगलंय....
प्रश्न : तुम्हीच सांगा कसा चांगला आहे? कारण, तुम्ही कदाचित त्यांचे प्रचार प्रमुख असाल?
उत्तर : आज मी प्रभारी आहे. प्रचार प्रमुख असेन किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील कॅँपेनचा एक भाग असेन. परंतु, विद्यमान खासदारांनी गावागावात त्यांचा संपर्क चांगला ठेवला आहे.
प्रश्न : नमो अॅपमधून उमेदवारीसाठी तुमचं नाव गेलं तर?
उत्तर : मला भाजपने न मागता बरेच काही दिले आहे. भाजपने माझा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी विचार केला होता. माझ्या आयुष्यामध्ये मोदी सरकार याचा विचार करत असेल तर या पार्टीला मी काही मागावं का? पार्टीकडे मी मागावं, असं काही नाही?
प्रश्न : तुम्ही मोदींच्या जवळ कसे पोहोचलात?
उत्तर : मी खासदार कसा झालोय हे तुम्हाला सांगतो. राज्यसभेच्या खासदारासाठी भाजपच्या ४० चांगल्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली. पत्र दिलं. ४० जणांची नावे घेऊन पार्लमेंटरी बोर्ड बसलं. त्यांनी त्यातून १० जणांची नावे शॉर्ट लिस्ट केली. त्या ४० जणांत माझं नाव नव्हतं. १० जणांच्या शॉर्ट लिस्टमध्ये ४ जणांची नावे अॅड झाली. १४ जणांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासमोर गेली. रात्री ११ वा. मला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला की, महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेसाठी तुमचं नाव निश्चित झालं आहे. पंतप्रधान आणि अमित शहांनी तुमचं नाव निश्चित केलं आहे. उद्या सकाळी तुम्हाला अर्ज भरायचा आहे.
१० मिनिटांनी मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल. आम्ही कुटुंबासोबत बसलो होतो. त्यांनी विचारलं की, कुणाचा फोन होता. मी हकिकत सांगितल्यानंतर सर्व जण म्हणाले की, कुणीतरी आपली मस्करी करीत आहे. अशीच चेष्टा होते. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचा फोन आला की, तुमची उमेदवारी निश्चित आहे. उद्या चंद्रकांतदादांच्या बंगल्यावर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. मग आम्ही कुटुंबातील सर्व जण एकमेकांना चिमटे घेऊ लागलो. अशा पद्धतीने मी खासदार झालो. भाजप आणि कम्युनिस्टमध्ये केडर बेस कार्यकर्त्यांना अशी चांगली संधी मिळते. अॅट्रॉसिटीच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने विरोधात निर्णय दिला. यासंदर्भात भाजपच्या वतीने भूमिका मांडण्याची संधी इतर कोणालाही मिळाली नाही. ती मला देण्यात आली.
प्रश्न : तुमच्यावर ‘पर जिल्ह्यातील परका उमेदवार’ असा आरोप होऊ शकतो ?
उत्तर : या मातीत घडणाºया अमराठी माणसांना तुम्ही बाहेरगावचे म्हणणार का? हा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे ज्यांनी या मातीशी, संस्कृतीशी इमान राखून सोलापूर घडविलं अशा अमराठी भाषिकावर अन्याय केल्यासारखं होईल.
प्रकाश आंबेडकर तडजोड करतील
- प्रकाश आंबेडकर सोलापूरचे उमेदवार असतील तर त्यांचे स्वागत करतो. त्यांची उमेदवारी असेल तर मजा येईल. दिग्गज उमेदवार असेल तर आपल्या उमेदवारीचा कस लागतो. या ठिकाणी जो उमेदवार असेल त्यालाही मजा येईल. पण प्रकाश आंबेडकर लढतील, असे मला वाटत नाही. प्रस्थापित काँग्रेसच्या उमेदवारासोबत त्यांची तडजोड होईल. ते उमेदवार उभा करणार नाही. असे अमर साबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अक्षता सोहळ्यात बनसोडेंना विचारलं, ‘प्रवास कसा झाला ?’
प्रश्न : विरोधकांच्या बाबतीत विशेषत: सुशीलकुमार शिंदे यांच्या बाबतीत तुमचा मुद्दा काय असेल?
उत्तर : व्यक्तिगत टीका करून माणूस मोठा होतो, यावर माझा विश्वास नाही. आपलं कर्तृत्व काय हे मी मांडावं. आपण या भागात काय विकास करू शकतो हे मांडावं. केंद्राच्या योजना आपण आणू शकतो का, हे मांडावं.. आणि तरीही आलं अंगावर तर घेऊ शिंगावर. त्यांची या पाच वर्षातील भूमिका काय होती. त्यांनी कोणत्या विषयांचा पाठपुरावा केला. याचा लेखाजोखा आमच्याकडं तयार आहे.
प्रश्न : म्हणजे तुम्ही शिंदे फॅमिलीचा डेटा तयार करून ठेवलाय?
उत्तर : (हसून...) तेच ते. लेखाजोखा आहे आपल्याकडं.
प्रश्न : अक्षता सोहळ्यात तुमचं खासदार बनसोडेंशी बोलणं झालं?
उत्तर : त्यांची ख्याली खुशाली विचारली. कसे आहात, प्रवास कसा झाला वगैरे विचारलं.
प्रश्न : मग त्यांनीही तुम्हाला विचारलं असेलच की.. तुम्ही इकडे सोलापुरात कसे?
उत्तर : (दिलखुलास हसत) नाही. नाही. तसे काही नाही.
कॉँग्रेसचं खानदान राहतं दिल्लीत.. उभारतं अमेठीत !
- सोलापूरमध्ये बाहेरगावचा उमेदवार म्हणणं हा अप्रस्तुत मुद्दा आहे. या शहराची ऐतिहासिक आणि भौगोलिक रचना पाहिली तर या ठिकाणी अमराठी भाषिक लोक सोलापुरात आले. ते राहिले, त्यांनी मेहनत केली. त्यांनी कर्तृत्व गाजवलं आणि ते सोलापूरच्या मातीत मिसळून गेले. मग जर अमर साबळे बाहेरगावचा म्हटलं तर या मातीत, संस्कृतीत घडणाºया अमराठी माणसांना तुम्ही बाहेरगावचे म्हणणार का? लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं खानदान दिल्लीत गेलं ना. राहतात रायबरेलीला.
निवडणुकीला उभं राहतात अमेठीला, चिकमंगळूरला. नेतृत्वाने कोणत्याही राज्यात जाऊन निवडणूक लढविली तर ते बाहेरगावचे ठरत नाही. भारतीय संविधानाने दिलेल्या निवडणुकीच्या अधिकारामध्ये कुणीही कुठंही उभ राहू शकतं. त्यामुळं अमर साबळेंना सोलापूरमध्ये बाहेरगावचा म्हणणं म्हणजे या मातीमध्ये, ज्यांनी मातीशी, संस्कृतीशी इमान राखून सोलापूर घडविलं अशा अमराठी भाषिकांवर अन्याय केल्यासारखं आहे. बाहेरगावचा मुद्दा असूच शकत नाही.