अशोक कांबळेमोहोळ : दोन महिन्यांपूर्वी १५ एकर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली़ एकरी ५ हजार रुपयांप्रमाणे या क्षेत्रासाठी सुमारे ७५ हजार रुपये खर्च आला़ सध्या अडीच ते तीन फुटांपेक्षा जास्त उंची ज्वारीची थाटे आली आहेत़ यंदा पाऊस कमी असतानाही ज्वारीचे उत्पन्न वाढणार आणि जनावरांना कडबाही उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती; मात्र परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले, अशी व्यथा देवडी येथील महिला शेतकरी लता दिनकर थोरात यांनी व्यक्त केली.
त्यांच्याशी प्रत्यक्ष शिवारात जाऊन संवाद साधला असता त्या म्हणाल्या, गेल्या तीन वर्षांपासून सलग पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईला सामोरे जावे लागले होते़ यंदा पाऊस पडेल, अशी खात्री होती़ त्यामुळे शेतीची मशागत करून तब्बल १५ एकर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली़ यासाठी खर्चही केला; मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आणि सुमारे अडीच ते तीन फूट उंच आलेली ज्वारीची धाटे भुईसपाट झाली़ डोळ्यादेखत या पिकाचे नुकसान होत असलेले पाहावत नाही़ पण करणार काय? आता जनावरांच्या चाºयाचे काय करायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच मोहोळ तालुक्यातील खरीप,रब्बी पिकांसह द्राक्ष व डाळिंब बागांचे सुमारे ७५०० हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे़ हाताशी आलेले पीक पाण्यात गेल्याने अनेक शेतकरी बांधावर बसून त्या पिकाकडे पाहून गहिवरताना दिसून आले.
तालुक्यात २६०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती तर १६०७ हेक्टर क्षेत्रावर मका तर २०१३ हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणी झाली होती.
परतीच्या पावसाने मोहोळ मंडलसह नरखेड, पेनूर, टाकळी, कुरूल, सावळेश्वर,कामती या सर्वच भागात कमी-जास्त प्रमाणात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले़ आता या सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे काम मोहोळ महसूल विभागाच्या वतीने सुरू आहेत़ मोहोळ तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत २ हजार ३५० शेतकºयांच्या १९५६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे केले आहेत़ पंचनाम्याचे काम आणखीनही सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे यांनी सांगितले.
मोहोळ तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरू आहे़ शासनाकडून दिला जाणारा मोबदला मिळवून देण्यासाठी महसूलची यंत्रणा काम करीत आहे़
- जीवन बनसोडे, तहसीलदार