सोलापूर : १९ फेब्रुवारी... सोलापूरकरांना या तारखेची दरवर्षीच प्रतीक्षा असते. अवघ्या मराठीजनांचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस अर्थात शिवजयंती साजरी करण्यासाठी सारे जणच आतुर असतात... यंदाच्या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी आत्तापासूनच सुरू झाली असून, सोलापुरात प्रथमच २१ फुटी उंच पूर्णाकृती शिवमूर्ती साकारली जात आहे.
महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्ती विकण्यासाठी चौका-चौकात राजस्थानी मूर्तीकार दाखल झाले आहेत. मूर्तीकार सत्यजित रामपुरे हे एकवीस फुटी पूर्णाकृती मूर्तीवर अखेरचा हात फिरवित आहेत. डी. एम. प्रतिष्ठानच्या वतीने सातरस्ता येथे या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मूर्तीकार रामपुरे यांनी सांगितले की, गेल्या २२ दिवसांपासून आम्ही महाराजांची सोलापुरातील सर्वात उंच मूर्ती साकारत आहोत. यासाठी आठ कारागिर दिवस-रात्र राबत आहेत. सध्या मातीचा वापर करून ही मूर्ती आम्ही पूर्णत्त्वास नेली आहे. या मूर्तीचे कास्टींग तयार करण्यात येणार असून, त्यानंतर ती फायबरमध्ये साकारली जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान शहरातील चौकांमध्ये राजस्थानी कलावंतही छोट्या शिवमूर्ती साकारण्यात मग्न आहेत.