सोलापूर : शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणारे बेशिस्त दुकानदार, नागरिक अशा २५० हून अधिक जणांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी रात्री दंडात्मक कारवाई केली. गोरगरीब महिलांनी घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय लावून घेतली आहे. तुम्हीसुध्दा ही सवय लावून घ्या. आपलं सोलापूर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी घ्या, असे आरोग्य निरीक्षकांनी या दुकानदार आणि नागरिकांना सुनावल्याचे सांगण्यात आले.
घंटागाडी येऊनही शहराच्या विविध भागातील दुकानदार, नागरिक, संस्था रस्त्यावर कचरा टाकत आहेत. या बेशिस्त लोकांची पोलखोल करण्याचे काम शहरातील स्मार्ट महिलांनी लोकमतच्या माध्यमातून सुरू केले आहे. या महिलांनी दिलेली माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे. मनपा आरोग्य विभागाकडून नियमित कारवाई केलीच जाते. परंतु, लोकमतच्या मोहिमेनंतर आरोग्य विभागाने सोमवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. महापालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली.
शहराच्या विविध भागात रात्री जाऊन दुकानाबाहेर पडलेल्या कचºयाचे फोटो काढा, दुकान उघडे असेल तर त्याच ठिकाणी त्यांना दंड करा, दुकान बंद असेल तर दुसºया दिवशी सकाळी जाऊन दंड आकारणी करा, असे आदेश दिले. त्यानुसार नवी पेठ, शिवाजी चौक, चाटी गल्ली, सात रस्ता या भागातील चायनीज गाडीवाले, हॉटेल्स, पानपट्टी चालक यांना दीडशे ते अडीचशे रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला. जे दुकानदार दंड भरण्यास नकार देत आहेत त्यांच्याविरुध्द पोलिसांत तक्रार करण्यात येत असल्याचे आरोग्य निरीक्षकांकडून सांगण्यात आले. ही मोहीम कायम राहणार असल्याचेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.
प्रभाग ९ मध्ये काढणार जनजागृती फेरी - नागरिकांनी आपला कचरा नियमितपणे घंटागाडीतच टाकावा, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या मोहिमेत सहभाग नोंदवावा यासाठी जुळे सोलापूर भागातील नगरसेविका जनजागृती फेरी काढणार आहेत. त्याप्रमाणे पूर्व भाग, होटगी रोड परिसर या भागातही जनजागृती फेरी काढण्यात येईल, असे नगरसेवक नागेश वल्याळ आणि संतोष भोसले यांनी जाहीर केले. ज्या भागात घंटागाड्या येत नाहीत त्या भागातील नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा. प्रशासनाशी समन्वय साधून आम्ही नियमितपणे घंटागाड्यांचे नियोजन करु. पण रस्त्यावर कचरा टाकू देणार नाही. आमचा प्रभाग घाण करु देणार नाही, असे वल्याळ आणि भोसले यांनी सांगितले.
कारवाईच्या भीतीने शिमलानगरात जाळला कचरा- विजापूर रोड भागातील काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. गुलमोहर अपार्टमेंटजवळ कचºयाचे ढीग झाले होते. रस्त्यावर कचरा टाकणाºयांची नावे या भागातील स्मार्ट महिलांनी महापालिकेला कळविली आहेत. कारवाईच्या भीतीमुळे सोमवारी हा कचरा जाळून टाकल्याचे पाहायला मिळाले.