सोलापूर : आपल्या बाजारपेठेची बलस्थानं ठाऊक असताना, सोलापूरकर ग्राहक मात्र अत्यंत घाईतला आणि धोकादायक प्रवास करत पुण्या-मुंबईला आणि अन्य शहरात स्वतंत्र वाहने करून जातात अन् सांगेल त्या दराने, कमी वेळात उपलब्ध असतील तशा वस्तू माथी मारून घेऊन रातोरात सोलापुरात परततात. त्यांचा हा घाईतील प्रवास अन् खरेदीची नाहक धांदल त्यांच्या स्वत:साठी नुकसानकारक ठरत आहेच; पण यामुळे सोलापूरच्या बाजारपेठेचीही मोठी हानी होत आहे.
एकेकाळी महाराष्टÑात चौथ्या क्रमांकाचे शहर असलेल्या सोलापूरचे हे स्थान खाली गेले असले तरी येथील बाजारपेठ पहिल्यापासूनच जशी समृद्ध होती; तशीच आजही कायम आहे. व्यापाºयांनीही व्यवसायात आधुनिकता आणलेली आहे. शिक्षित, उच्चशिक्षित युवक रोजगाराची तात्पुरती संधी म्हणून व्यापारपेठांतील दुकानांमध्ये सेल्समन म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडून ग्राहकांना तत्परतेने सेवा मिळत आहे, हा अनुभव अनेकांनी अनेकवेळा घेतलेलाही आहे. व्यापाºयांमध्ये व्यवसायाची निकोप स्पर्धा असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळत असल्याचेही निदर्शनास येते; पण असंख्य सोलापूरकर ग्राहकांना बाहेरच्या शहरात जाऊन खरेदी करण्याचा मोह काही आवरत नाही.
सोलापुरात साड्यांची स्वतंत्र दालने आहेत. सर्व प्रकारच्या साड्या येथे स्पर्धात्मक दरात उपलब्ध आहेत. सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी तर आपला सराफ कट्टा प्रसिद्धच आहे. शिवाय पुण्या-मुंबईची काही ब्रँडेड दालनंही सोलापुरात थाटलेली आहेत. तरीही दागिने खरेदी बाहेर जाऊन केली जाते, याबद्दल व्यापाºयांनीही आश्चर्य व्यक्त केलेले आहे. चादर-टॉवेलच्या उत्पादन आणि विक्रीचे सोलापूर हे देशातील प्रसिद्ध हब आहे; पण टर्किश टॉवेल्सचे जंबो पॅक टीव्हीवरील ‘शो’ पाहून आॅनलाईन मागविण्याचा ग्राहकांंचा कलही दिसून येतो.सोलापुरात ग्राहकांची ही मानसिकता आहेच; पण जिल्ह्यातील पंढरपूर,माळशिरस, सांगोला आदी तालुक्यातील ग्राहकही पुणे, कोल्हापुरात खरेदीसाठी जातात, हे कधी ऐकून, पाहून निदर्शनास येते. लग्न सराईमध्ये किंवा कुटुंबामध्ये एखादा मोठा समारंभ असेल तर सोलापूरकर ग्राहक स्वत:ची किंवा प्रसंगी भाड्याने वाहन घेऊन पुण्या-मुंबईला खरेदी करायला जातात.
हे सारेच मोठं खर्चिक असतं. सहकुटुंब खरेदीला जाण्यासाठी इनोव्हा किंवा तवेरासारख्या मोठ्या गाड्या भाड्याने घ्याव्या लागतात. यासाठी अनुक्रमे १३ रुपये, ११ रुपये प्रतिकिलोमीटर दर आहे. सकाळी प्रवासाला निघाल्यानंतर दुपारपर्यंत पुण्यात आणि सायंकाळी मुंबईत वाहन पोहोचंत. त्यानंतर घाईघाईत खरेदी केली जाते. मुक्काम करणे परवडणारे नसल्यामुळे रातोरात ग्राहक सोलापूरकडे निघतात....हा साराच प्रवास धोकादायक असतो...प्रस्तुत प्रतिनिधीने अशा प्रवासी ग्राहकांच्या दौºयाचे आणि धांदलीचे अनेक किस्से ऐकलेले आहेत.
सोलापूरकर ग्राहकांच्या या मानसिकतेमुळे या शहराच्या बाजारपेठेचे मात्र मोठे नुकसान होत आहे. शहरातील अनेक बाजारपेठा ऐन हंगामात ओस पडताना दिसून येत आहेत, ग्राहकांची ही मानसिकता बदलण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी व्यापारी संघटनांनी पुढाकार घ्यावा आणि सोलापुरातील पैसा सोलापुरातच खर्ची व्हावा, अशी अपेक्षा अनेक व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
हो, खरेदीसाठी प्रवासाला निघतात!- सोलापुरातील ग्राहक खरेदीसाठी मोठ्या संख्येने प्रवासाला निघतात, हा माझाही अनुभव असल्याचे ट्रॅव्हल एजंट दत्ता शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आमच्याकडे गाड्यांचे बुकिंग होते. प्रवासाचा दिवस ठरतो. भाडे ठरते; पण प्रवास कशासाठी करत आहेत, याची कल्पना आम्हाला नसते; पण पुण्या-मुंबईत गेल्यानंतर गाडी जेव्हा एखाद्या कपडे, सोन्या-चांदीच्या दालनासमोर उभी करायला सांगितली जाते तेव्हाच प्रवासाला आलेले ग्राहक खास गाडी भाड्याने घेऊन प्रवासाला आल्याचे आम्हाला समजते, असे शिंदे म्हणाले.