सोलापूर : सात रस्ता ते रेल्वे स्टेशन, वाडिया हॉस्पिटल ते कोनापुरे चाळ या भागात रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबावेत. हा परिसर नियमितपणे स्वच्छ दिसावा यासाठी काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल आणि वैष्णवी करगुळे यांनी पुढाकार घेतला आहे.
घंटागाडी येऊनही रस्त्यावर कचरा टाकणाºयांची पोलखोल करण्याचे काम शहरातील स्मार्ट महिला ‘लोकमत’च्या माध्यमातून करीत आहेत. या अभियानामध्ये जुळे सोलापूर, पूर्व भागातील नगरसेवकांनी सहभाग नोंदविला आहे. आता प्रभाग क्र. १६ च्या नगरसेविका फिरदोस पटेल आणि प्रभाग क्र. १५ च्या नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी वेगळ्या पध्दतीने सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. फिरदोस पटेल म्हणाल्या, स्मार्ट सिटी योजना जाहीर झाल्यापासून आम्ही आमच्या प्रभागात घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू केलेले आहे.
आमच्या घंटागाड्या नियमितपणे कचरा संकलित करतात. गांधीनगर, केशवनगर, आंबेडकरनगर, शानदार चौकातील कचरा कोंडाळी हटविण्यात आली. ज्या ठिकाणी कचरा कोंडाळी होती तो परिसर आम्ही स्वच्छ करुन घेतला. तिथे वृक्षारोपण करुन तो परिसर स्वच्छ केला. यासाठी शासन मदतीची वाट पाहिली नाही. या सर्व गोष्टी स्वखर्चातून केल्या आहेत. आता आम्ही लोकमतच्या अभियानात सहभागी होऊन स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूरसाठी काम करु.
जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, कोनापुरे चाळ या भागात रस्त्यावर कचरा असतो. घंटागाडी आली नाही तर आम्ही झोनला फोन करतो. तरीही लोक रस्त्यावर कचरा टाकतात हे पाहून वाईट वाटते. आमचा प्रभाग आता स्वच्छ असला पाहिजे, यासाठी आम्ही लोकांना रस्त्यावर कचरा टाकण्यापासून रोखणार आहोत. जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल. जे लोक चांगले काम करतील, त्यांचा गौरव करण्यात येईल. - वैष्णवी करगुळे, नगरसेविकासध्या मोदीखाना, रेल्वे स्टेशन रोड या भागात खूपच कचरा दिसतो. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी. पण त्यांना नियमितपणे घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय लागायला हवी. ‘लोकमत’च्या स्मार्ट सखी यासाठी सध्या काम करीत आहेत. त्याच पध्दतीने आम्ही आमच्या वॉर्डात स्मार्ट सखींची टीम तयार करणार आहोत. सात रस्ता परिसरात ज्या भागात मेडिकल आहेत तिथे मेडिकल वेस्टेज रस्त्यावर टाकले जात आहे. तिथे झाडी लावून तो भाग सुशोभित करणार आहोत. - फिरदोस पटेल, नगरसेविका