सोलापूर : एसटीमधील प्रवास हा नेहमी महिलांसाठी सुरक्षित मानला जातो, पण तरीही एसटीमध्ये रात्री प्रवास करताना महिलांना आणखीन सुरक्षित वाटावे यासाठी एसटी महामंडळाने एक चांगला निर्णय घेतला आहे. जर एखादी महिला रात्री एसटीमध्ये प्रवास करताना तिला असुरक्षित वाटले, तर तिने वाहकाला सांगितल्यास एसटीमधील दिवे रात्री सुरूच राहतील. एसटी महामंडळाचा हा निर्णय योग्यच आहे. यासोबत प्रत्येक एसटी गाडीमध्ये महिलांच्या मदतीसाठी ‘पॅनिक’ बटनही बसवावे, अशी मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.
रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना कार किंवा इतर प्रवासी वाहनांमधील आतील लाईट चालू असतील, तर चालकाला काचेवर गाडीतील चित्र रिफ्ले क्ट होते. यामुळे त्याला समोरचा रस्ता अस्पष्ट दिसतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी चालक हा लाईट बंद करण्यास सांगत असतो, पण आता प्रवासी महिलेच्या विनंतीवरून हे लाईट चालू ठेवावे लागतील.
एकदा सांगा दिवे बंद होणार नाहीत
- एसटीमधून प्रवास करत असताना रात्रीच्या वेळी आपल्या छोट्या-मोठ्या साहित्याची चोरी झाल्याच्या घटना अनेकांसोबत घडल्या असतील, पण आता या घटनांवर आळा बसेल.
- तसेच काही वेळेस एकटी स्त्री रात्री प्रवास करत असताना तिच्या शेजारी बसलेल्या समाजकंटक पुरुषाकडून तिला त्रास होऊ शकतो. अशावेळी त्या स्त्रीने वाहकाला सांगितल्यास एसटीमधील दिवे पूर्ण प्रवासात सुरूच असतील.
एसटी महामंडळाने जो निर्णय घेतला आहे, तो अतिशय योग्य आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे. सध्या छेडछाड, विनयभंग अशा घटना वाढल्या आहेत. अशा काळात स्त्रियांच्या सुरक्षिततेचा विचार करता बसमधील दिवे हे रात्रीच्या वेळी सुरू ठेवलेच पाहिजेत. जेणेकरून कोणत्याही स्त्रीला अशा कोणत्याही वाईट प्रसंगातून जावे लागणार नाही. या निर्णयाचे स्वागतच आहे.- गायत्री अघोर, तरुणी.
रात्री प्रवास करताना एसटीमध्ये लाईट चालू ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत योग्य आहे. त्याचबरोबर प्रवासामध्ये लाईट चालू ठेवणे आणि एसटी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. जेणेकरून महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, तसेच प्रत्येक एसटीमध्ये महिला सुरक्षेसाठी एखादे ‘पॅनिक’ सुरक्षा बटन दिले पाहिजे.- अस्मिता गायकवाड, प्रवासी.