बार्शी : तालुक्यातील अलीपूर गावाजवळील बाह्यवळणावरून जाणार्या वाहनावर दगडफेक करून चोरट्यांनी वाहनातील महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील जवळजवळ पाच तोळ्याचे दागिने व रोख असा एक लाख ५० हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना या बाह्यवळणावर असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळ शनिवारी रात्री १२ नंतर घडली. याबाबत वाहनचालक सोनेराव नागुराव खांडेकर (४२, रा. चतुरवाडी ता. अंबाजोगाई, जिल्हा बीड) यानी शहर पोलिसांकडे तक्रार देताच पोलिसांनी भादंवि. ३९४ प्रमाणे अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सोनेराव खांडेकर हे आपल्या नातलगांसह एम.एच.२४ व्ही.२८९५ या वाहनातून कोल्हापूर येथील ज्योतिबाच्या देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून १० मे रोजी दुपारी बार्शीमार्गे परत निघाले. घटनास्थळाजवळ येताच वाहनास मोठा दगड लागून आवाज आला. काय झाले म्हणून गाडी थांबवली असता अंधारात अंगावर बनियन काळी पँट घातलेल्या दोघांनी येऊन धमकी दिली, अन्य दोघांनी गाडीत बसलेल्यांना चाकूचा धाक दाखवला व साखरबाई देवकते, गवळीनबाई देवकते, व्दारका सलगर, सुगंधा खांडेकर, संगीता खांडेकर आणि महादेवी खांडेकर यांच्या गळ्यातील दागिने, कर्णफुले व सूर्यकांत गडदे व गोपाळ सलगर यांच्या गळ्यातील सोन्याचे बदाम असे पाच तोळ्याचे दागिने तसेच दोन मोबाईल व रोख ६४०० रुपयांचा ऐवज चोरून पलायन केले. घटना घडताच सोलापूर जिल्हा पोलीसप्रमुख मकरंद रानडे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, बार्शी विभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार, पंढरपूर वि.पोलीस अधिकारी प्रशांत कदम, करमाळ्याचे अनिल पाटील, गुन्हे अन्वेषणचे आप्पासाहेब शेवाळे, पो.निरीक्षक सालार चाऊस यानी तातडीने घटनास्थळी भेट दिली . या घटनेतील आरोपींचा शोध लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांच्या मर्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यात पाठविण्यात आल्याचे विभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार यांनी सांगितले.