मोहोळ : २७ मे रोजी दुपारी चार वाजता अचानक आलेल्या वादळी वार्यासह गारपिटीत मोहोळ तालुक्यातील खंडाळी, पापरी परिसरात सुमारे ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे झालेल्या पडझडीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी युद्धपातळीवर सुरू केले आहे. तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या भेटी घेतल्या़ आहेत़ वादळी वार्यास गारपिटीने घातलेल्या हैदोसात खंडाळी, पापरी परिसरातील सुमारे २०० घरांवरील पत्रे उडून गेले तर केळीच्या बागांसह वीज वितरण कंपनीचे ५०० पोल निकामी झाले. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वीज कंपनीचे २५ ते ३० कर्मचारी विद्युत खांब दुरुस्त करण्याचे काम करीत असून, खांब कमी पडत असल्याने कामात व्यत्यय येत आहे. मोहोळ तालुक्याला यावर्षी निसर्गाने दगा देत फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत सुमारे ४५ कोटींचे नुकसान झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना महसूल व कृषी विभागाने रात्रीचा दिवस करीत गारपीटग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करून सुमारे ३० कोटी रुपयांचे वाटप केले. उर्वरित अनुदानापैकी १७ कोटी पुन्हा आले असून, त्याचेही वाटप चालू असताना २७ मे रोजी खंडाळी-पापरी या दोन गावांसह अन्य गावात जोरदार वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीने कहर केला. एक तासाच्या या गारपिटीने खंंडाळी व पापरी परिसरातील सुमारे २०० घरांवरील पत्रे उडाले तर केळीच्या बागा, शेवग्याची शेती उद्ध्वस्त झाली. राजेंद्र जगन्नाथ मुळे यांची चार एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली तर रोशन नारायण जगताप (वय ८०) या वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड पडल्याने तिच्या पायाला जखम झाली. महेश जनार्दन मुळे यांची साडेचार एकराची केळीची बाग गारांचा मार्यामुळे जमीनदोस्त झाली.
-----------------
वीज वितरणचे मोठे नुकसान
खंडाळी, पापरी परिसरातील अन्य गावात झालेल्या वादळी वार्यात वीज वितरण कंपनीचे सुमारे ५०० खांब निकामी झाले. त्यामध्ये १६८ खांब मोडले तर १०६ खांब वाकले आहेत. १७८ खांबांवरील तारा तुटल्या आहेत. यामुळे तीन हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. २५ ते ३० कर्मचार्यांच्या मदतीने पोल उभे करण्याचे काम सुरू आहे. नवीन खांब कमी पडत असल्याने कामात व्यत्यय येत आहे. नवीन खांब उपलब्ध झाले तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागेल, असे वीज वितरण विभागाचे सहा़ अभियंता संजय शिंदे यांनी सांगितले.