कोरोना महामारीमुळे संपूर्ण अर्थचक्र मंदावले आहे. या अर्थचक्राला गती देण्यासाठी धडपड करत आहे. एसटी महामंडळसुद्धा याच परिस्थितीतून जात आहे. प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत उत्पन्न अतिशय कमी असले तरी एसटीचा तोटा कमी करून कर्मचाऱ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू झाल्याचे दिसत आहे.
रासायनिक खते, शेतीमाल, सिमेंट वाहतुकीसाठी एसटीच्या मालवाहतूक सेवेचा वापर होत आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून एसटीची प्रवासी वाहतूक कोलमडली आहे. गेल्यावर्षी तर मार्चपासून सहा महिने प्रवासी वाहतूक सुरळीत न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर झाले नव्हते. अखेर एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीला पर्याय म्हणून मालवाहतुकीचा पर्याय निवडला. एसटीला गेल्या वर्षभरामध्ये तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटीचा तोटा वाढला आहे. एकूण महसुलाच्या तिकीट विक्रीच्या माध्यमातून ९८ टक्के महसूल एसटीला प्राप्त होतो. परंतु, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा ओघ कमी असल्यामुळे धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे. यातून दररोज सुमारे चार लाख ५० रुपयांचा महसूल मिळत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता तिकीट विक्रीव्यतिरिक्त अन्य महसुलाचे मार्ग एसटीने शोधण्यास सुरुवात केली. मंगळवेढा आगारातून जूनपासून एसटीने मालवाहतूक सुरू केली आहे.
कोट :
एसटी मालवाहतुकीचे दर माफक असल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली लालपरी आता व्यावसायिकांच्या पाठबळावर मालवाहतुकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात मंगळवेढा आगाराला मालवाहतुकीतून तब्बल ११ लाखांचा महसूल मिळाला आहे.
-गुरुनाथ रणे
स्थानक प्रमुख, मंगळवेढा